अमरावती : कोरोनाचा महास्फोट होत असताना आता एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. बोगस कोरोना रिपोर्ट दाखवून विमा कंपन्यांना लाखो रुपयांना कसा गंडा घातला जातोय, विविध फायदे कसे उकळले जातायत, याचा गौप्यस्फोट करणारा हा खास रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावतीत कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट देणारं रॅकेट?


कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा झी २४ तास पर्दाफाश करणार आहे. कोरोना नसलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दाखवून विम्याचे लाखो रुपये उकळण्याचा गोरखधंदा राज्यात सर्रास सुरू आहे. या रिपोर्टचा वापर करून अनेक जण ठिकठिकाणी गंडा घालतायंत. कुणी विमा कंपन्यांना लुटत आहेत. तर कुणी कामावर दांड्या मारत आहेत. अशाच बोगस रिपोर्टच्या गौडबंगालाची धक्कादायक ऑडिओ क्लिप झी २४ तासच्या हाती लागली आहे. या क्लीपमध्ये विमा एजंट आणि बोगसगिरी करणाऱ्यात काय संवाद झालाय ते तुम्ही व्हिडिओ मध्य़े पाहू शकता.


लाखो रुपयांच्या विम्यासाठी खोट्या रिपोर्टचा धंदा?


बोगस पॉझिटीव्ह रिपोर्ट दाखवून कर्मचारी कामावर दांड्या मारतात
बोगस रिपोर्ट दाखवून विमान प्रवास करतात
बोगस रिपोर्ट दाखवून मेडिकल इन्शुरन्स उकळतात
बोगस रिपोर्ट दाखवून पोलीस किंवा ईडीची चौकशी टाळली जाते.


अशाच बोगसगिरीचा अनुभव कुणा सामान्य नागरिकाला नव्हे तर चक्क अमरावतीतल्या लोकप्रतिनिधीलाच आल्यानं आणखीनच खळबळ उडाली. जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील अशाप्रकारचं रॅकेट सक्रीय असल्याची शंका बोलून दाखवली आहे. तर या सगळ्या रॅकेटची चौकशी करण्याची मागणी भाजपनं लावून धरली आहे. 


बोगस कोरोना रिपोर्ट रॅकेटमुळं जिल्हा प्रशासनाची झोप पार उडाली आहे. झी २४ तासच्या हाती लागलेल्या धक्कादायक ऑडिओ क्लीपमुळे बोगस  कोरोना रिपोर्टच्या रॅकेटचा पर्दाफाश तर झालाय. कोरोनासारख्या महासंकटातही आपलं उखळ पांढरं करणाऱ्या अशा कंटकांना प्रशासन कसा चाप लावणार हा खरा प्रश्न आहे. 


'झी २४ तास'वर बोगस रिपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश