अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुणे महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात बनवाबनवीचा अनोखा प्रकार समोर आलाय. या रुग्णालयात आज एकाच वेळी सुमारे २०० बोगस रुग्ण आढळून आले. पुण्यातील लोहगावच्या डी वाय पाटील कॉलेजनं आपल्या निरोगी आणि तंदुरुस्त अशा कामगारांनाच बोगस रुग्ण बनवून रुग्णालयात दाखल केल्याचं समोर आलय.  मात्र हा सगळा खटाटोप कशासाठी याचं उत्तर मिळत नाहीये.


काहीही आजार नसलेले रुग्ण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही माणसं अगदी धडधाकट आहेत. त्यांना काहीही झालेलं नाहीये. मात्र आपल्याला इथे कशासाठी आणलंय हे त्यांना स्वतःलाही माहिती नाही. एरवी बऱ्यापैकी रिकामं असणारं हे रुग्णालय शुक्रवारी अशा रुग्णांनी भरून गेलं होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील वॉर्डमधील सगळ्याच खाटांवर रुग्ण होते. त्यामध्ये महिलाही मोठ्या संख्येनं होत्या. हे असं अचानकपणे कसं घडलं हा प्रश्न स्थानिक नगरसेविकेला पडला आणि सगळी बनवाबनवी उघडकीस आली. 


बनावट रूग्ण


या रुग्णांचे प्रत्यक्षातील नाव, पत्ते आणि केस पेपरवरील नाव पत्ते वेगवेगळे होते. कित्येक रुग्णांच्या हातावर सुया नुसत्याच चिकटवण्यात आल्या होत्या. या तथाकथित रुग्णाचं तर सोडाच इथले वैद्यकीय अधिकारीदेखील या प्रकाराबद्दल अनभिज्ञ आहेत. हे बघून त्यांना केवळ धक्काच बसला नाही तर डी वाय पाटील वाल्यांनी महापालिकेच्या रुग्णालयात घुसखोरी केल्याचा त्यांचा आरोप आहे. 


काही बोलण्यास नकार...


माध्यम प्रतिनिधी तसंच पोलीस घटनास्थळी पोचताच डी वाय पाटील मधील कर्मचाऱ्यांचीही भंबेरी उडाली. प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून आलेल्या कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं टाळलं.


संशय आणखीनच बळावला


इथलं सगळं वातवरण तसेच कर्मचाऱ्यांची वागणूक बघून संशय आणखीनच बळावला आहे. राजीव गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांपर्यंत विषय पोचवलाय. त्यामुळे पुढे काय कारवाई होते ते बघावं लागेल. तूर्तास तरी गौडबंगाल कायम आहे.