बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा, सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्यांना मोठा दणका, थेट यादीच केली जाहीर
सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या लोकांची यादी महाराष्ट्र क्रीडा विभागाने केली जाहीर
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : राज्याच्या क्रीडा विश्वाला हदरावणारी बातमी. राज्यातील क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्र दाखवून सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या लोकांची यादी महाराष्ट्र क्रीडा विभागाने जाहीर केली आहे. यामध्ये 92 खेळाडू आहेत ज्यांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र दाखवून सरकारी नोकरी लाटली आहे.
क्रीडा विभागाच्या प्रमाणपत्र पडताळणीत हे प्रमाणपत्र खोटे ठरले आहे. या नावांची यादी महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर टाकली आहे. एकूण 109 लोकांची ही यादी आहे इतकच नाही तरी यातील 17 खेळाडूंची शासकीय सेवा रद्द करण्याची शिफारस सुद्धा आता क्रीडा विभागाने केली आहे.
बोगस खेळाडू आणि बोगस क्रीडा प्रमाणपत्र याची बातमी झी 24 तासाने वारंवार दाखवली होती आणि हा सगळा प्रकार उघडकीस आणला होता. झी 24 तासच्या बातमीची दखल घेत राज्य सरकारकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.
सॉफ्ट बॉल, ट्रंपोलिन या खेळाचं प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचं झी 24 तास आपल्या बातम्यांमध्ये मांडलं होतं. आता क्रीडा विभागाने यावर शिक्कामोर्तब करत कारवाईचा बडगा उभारला आहे.