जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोल्यातील भाजप खासदाराचे (BJP MP) घर आणि अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे  बॉम्बने (bomb threat) उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे घर अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर उडवून देणार असल्याचा धमकीचा फोन आला होता. नियंत्रण कक्षाने ही माहिती रेल्वे पोलिसांसह अकोला पोलिसांना दिली. 


त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री १० वाजून ४० मिनिटपर्यंत अकोला-पूर्णा रेल्वे गाडीची संपूर्ण तपासणी केली. खासदार संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला. मात्र पोलिसांना कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून न आल्याने ही अफवा असल्याचे समोर आले आहे.



माहिती मिळाल्यानंतर अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष पथक, श्वान पथक, बॉम्ब पथक, जीआरपी, आरपीएफ पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरची तपासणी केली. यावेळी प्रवाशांचीही कसून तपासणी करण्यात आली. 


मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आली नाही. त्यानंतर रेल्वे सोडण्यात झाली. दरम्यान, आता बॉम्बची अफवा पसरवणारा फोन कोणी केला याचा शोध घेण्यात येत आहे.