अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : आधीच सातत्याने संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या जीवावर आता नवं संकट उठल आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पश्चिम विदर्भातील लाखो हेक्टर कपाशीवर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केल्याने कपाशी पीक शेतकर्‍याच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. पूर्वीच खोडकीड व परतीच्या पावसाने सोयाबीनने शेतकऱ्यांच तेल काढल्यानंतर आता कपाशीवरील बोंड अळीने देखील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. पांढर सोनं म्हणून मिरवणाऱ्या कापसाने शेतकऱ्याच्या जीवाला घोर लावलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन बायस्कर या अमरावतीच्या रघुनाथपुरातील युवा शेतकऱ्याची लॉकडाऊनमूळे हाताची नोकरी केली. त्यानंतर तो शेतीची कामे करु लागला. मागच्या वर्षी वडीलांनी शेती कसली आणि कापूसही चांगला झाला पण कोरोनाने घात केला. 


साडेपाच हजार रुपये क्विंटलने विकल्या जाणार कापूस कवडिमोल भावात विकला नोकरी गेल्याने सचिन शेतीत रुजला पण बोंड अळीने मात्र पांढऱ्या सोन्यावर आघात केला.



बोंड अळी ही एकट्या सचिनच्या शेतातील कपाशीवर आली नाही तर पश्चिम विदर्भातील ७ लाख ५० हजार हेक्टर वरील कपाशीपैकी हजारो हेक्टरवर या बोंड आळीने आक्रमक केलं आहे. आधी परतीचा पाऊस आणि आता त्यात आलेल्या बोंड अळीने मात्र शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात अद्यापही शासकीय कापूस खरेदी सुरू झाली नाही.


सध्या पश्चिम विदर्भातील कापूस हा वेचणीला आला आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी मात्र कापुसच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. शेतातील कपाशी हिरवी दिसत असली तरी मात्र कपाशीच्या बोंडात जन्म घेतलेल्या गुलाबी बोंड अळीने मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला आहे.


दिवाळी तोंडावर आहे. पूर्वी सोयाबीन गेलं आता कापूसही गेला त्यामुळे आता पांढऱ्या सोन्याने मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याने शेतकऱ्याच जगणं कठीण झालंय.