Woman Arrested At Mumbai Airport: महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठं यश मिळालं आहे. डीआरआयने विमानतळावर एका ब्राझीलियन तरुणीला अटक केली आहे. या तरुणीकडून डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कोकेनच्या तब्बल 124 गोळ्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या गोळ्या महिलेच्या पोटात होता. मुंबई विमानतळावर विमान लॅण्ड करण्यापूर्वी या महिलेने या गोळ्या गिळल्या होत्या.


या पदार्थाची किंमत 9.73 कोटी रुपये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या या महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या या 124 कॅप्सूल्समध्ये असलेल्या कोकेनची अंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तब्बल 9 कोटी 73 लाख रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला अटक केल्यानंतर आता हा संपूर्ण प्रकार म्हणजे अंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीच्या कटाचा भाग असल्याचं सांगितलं जात असून या महिलेबरोबर इतर कोणकोणत्या व्यक्ती यात सहभागी आहेत याचा शोध गेतला जात आहे. 


गुप्त माहितीच्या आधारे कारवाई


महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही छापेमारी करण्यात आली. बुधवारी ही तरुणी ब्राझीलमधून साओ पावलो विमानतळावरुन मुंबईत येणाऱ्या विमानात असून तिच्याकडे अंमली पदार्थ आहेत अशी गुप्तचरांची माहिती होती. रविवारी या कारवाईसंदर्भातील माहिती, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिली. या महिलेला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता तिने आपल्या पोटात कोकेनच्या गोळ्या असल्याची कबुली दिली आहे.


दिली कबुली


भारतामध्ये अमली पदार्थांची तस्करी करण्याच्या उद्देशाने आपण या गोळ्या गिळल्या होत्या आणि त्या शरीरात लपवून भारतात आणण्याचा आपला इरादा होता असं या महिलेने सांगितलं आहे. या महिलेला जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर तिला भायखळ्यातील सरकारी रुग्णालय असलेल्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली?


"तिने एकूण 124 गोळ्या गिळल्या होत्या. ज्यामध्ये 973 ग्राम कोकेन सापडलं आहे. या कोकेनची किंमत 9.73 कोटी रुपये इतकी आहे. या पदार्थांची चाचणी केली असता ते कोकेन असल्याचं सिद्ध झालं आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार या गोळ्यांमधून रिकव्हर केलेलं कोकेन जप्त करण्यात आलं आहे," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 


कसून तपास


या प्रकरणातील तरुणीला अटक करण्यात आली असून तिची चौकशी केली जात आहे. तिच्या चौकशीमधून तिच्यासोबत इतर कोणकोण या रॅकेटमध्ये सक्रीय आहे याची माहिती मिळवण्याचा तपास अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.