अतिश भोईर, डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत माकडाच्या हाती कोलीत दिल्याचा प्रकार समोर आलाय. दोन वेळा लाच प्रकरणात अटक झालेल्या वादग्रस्त अधिकाऱ्याकडे चक्क अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाला विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण - डोंबिवलीकरांनी कपाळावर हात मारून घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आलेला कल्याण डोंबिवली महापालिकेचा उपायुक्त सुनील जोशी याच्याकडे पालिका प्रशासनानं महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवून कायद्यासह नैतिकतेचेही धिंडवडे काढले आहेत. सुनील जोशी याच्याकडे अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाला विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आलीये. त्यामुळे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्याचा कारनामा केडीएमसीनं केलाय. 


सध्या गृहनिर्माण विभागाचा कार्यकारी अभियंता असलेल्या सुनील जोशीला आत्तापर्यंत दोन वेळा लाचखोरीच्या प्रकरणात अटक झालीये, तर तब्बल तीन वेळा निलंबित करण्यात आलंय. कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रशासकीय कारभार म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी मनस्ताप बनलाय. आधीच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या जोशी यांना केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी आता अनधिकृत बांधकाम विरोधी पथक आणि फेरीवाला विरोधी पथकाची जबाबदारी दिली आहे. या सगळ्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक चांगलेच संतप्त झालेत. 


दरम्यान, जोशी हे उपायुक्त नसून कार्यकारी अभियंता आहेत. शिवाय अशाप्रकारे अतिरिक्त जबाबदारी द्यायची झालीच, तरी ज्यांची भ्रष्टाचाराच्या किंवा अन्य प्रकरणात विभागीय चौकशी सुरू आहे, त्यांना जबाबदारी देऊ नये, या शासन आदेशांचा प्रशासनाला विसर चुकून पडला की जाणून बजून पडला हाच मोठा प्रश्न आहे. 


अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाला विरोधी पथक या दोन्ही विभागांचा कार्यभार जोशी यांच्यापूर्वी उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे होता. आणि विशेष म्हणजे, सुरेश पवार यांनाही एकदा लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. त्यामुळे खांदेपालट झाला असला, तरी राव गेले अन् पंत आले, इतकाच काय तो फरक, अशी चर्चा आहे.