प्रफुल्ल पवार / रायगड : अलिबाग (Alibaug) कोळीवाड्यातील मनाला चटका लावणारी घटना. वाहिनीचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर दिराला (Brother in law) हृदयविकाराचा झटका (heart attack) आला. त्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी दिराचा मृत्यू झाला. या घटनेने अलिबागमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोळीवाड्यातील सुलोचना परशुराम मुकादम (70 ) यांचे काल गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अलिबाग कोळीवाडा  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी सुरु होते. यावेळी त्यांचे दीर दिगंबर मुकादम हे देखील उपस्थित होते. 


वहिनी सुलोचना यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यावर दिगंबर मुकादम यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.  ते 75 वर्षांचे होते. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


 1947 साली अरबी समुद्रात 'रामदास बोटी'च्या दुर्घटनेतून बचावलेले स्व.बारकूशेट मुकादम यांचे ते भाऊ होते. एकाच घरातील दोघांचा अशाप्रकारे झालेल्या या मृत्यूमुळे कोळीवाड्यात हळहळ व्यक्त होत आहे.


सुलोचना बाई आणि दिगंबर मुकादम हे दोघे दीर भावजय होते. तरी त्यांचे नाते अगदी बहीण भावासारखे होते. सुलोचना बाईंची ते खूपच जिव्हाळ्याने काळजी घ्यायचे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नसावा, असे कोळीवाड्यातील ग्रामस्थानी सांगितले.