budget 2021: इतर मेट्रोंपेक्षा कशी वेगळी असणार नाशिकची मेट्रो
राज्यात पहिल्यांदाच असा अनोखा प्रकल्प राबवला जाणार आहे.
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी मेट्रोसंदर्भात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. महाराष्ट्रात नागपूर आणि नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू करणार आहेत. त्यासाठी बजेटमध्ये खास निधी जाहीर करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये घोषणा करण्यात आलेला मेट्रो प्रकल्प सर्वात जास्त खास असणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मेट्रो रेल्वे रस्त्यावर धावणार आहे. त्यासाठी खास 2 हजार 92 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिककरांसाठी आनंदाची बाब असली तरी त्याचा लाभ मात्र ठरावीकच नागरिकांना होण्याची शक्यता आहे.
राज्यात पहिल्यांदाच असा अनोखा प्रकल्प राबवला जाणार आहे. नाशिकची मेट्रो रुळावर नाही तर रस्त्यांवर धावणार आहे. या मेट्रोमध्ये कोससह इतर सुविधा इतर मेट्रोसारख्याच देण्यात आल्या आहेत. फक्त रुळांऐवजी रस्त्यांवर ही मेट्रो प्रवाशांना घेऊन धावणार आहे.
मेट्रोसाठी स्वतंत्र मार्गाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. इतकच नाही तर ही मेट्रो मुख्य कॉरिडॉरवरून जाताना चार्ज होईल त्यामुळे इतर ठिकाणी चार्जिंगचा प्रश्न उद्भवणार नाही.
या मेट्रोच्या कोच कमी असतील तर सुरुवातीला प्रवासी बसण्याची क्षमताही कमी असणार आहे. या मेट्रोच्या डब्यांना रस्त्यांवर धावण्यासाठी खास रबरचे टाय़र लावण्यात येणार आहेत. ज्यामुळे मेट्रो सुरळीतपणे रस्त्यांवर धावू शकणार आहे. य़ा मेट्रोसाठी नाशिकच्या रस्त्यांवर खास वेगळा मार्ग तयार केला जात आहे.
नाशिकमध्ये गंगापूर ते मुंबई नाका आणि गंगापूर ते नाशिक रेल्वे स्थानक अशा दोन कॉरिडॉरमध्ये ही मेट्रो असणार आहे. यामध्ये 10 स्थानकांचा सामावेश करण्यात आला आहे. पहिला कॉरिडोर गंगापूर ते मुंबई नाका असून याची लांबी 10 कि.मी आहे. दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड दरम्यान असून याची लांबी 22 कि.मी आहे. या अंतर्गत 15 स्टेशन असतील.