Budget 2024 No Funds For Maharashtra: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे, अशी टीका केंद्रीय अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आंध्र प्रदेशला केंद्र सरकारकडून 15 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. तसेच बिहारमधील पूरनियंत्रणासाठी 11500 कोटींची आणि मूलभूत सुविधांसाठी 26 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन वडेट्टीवार यांनी उघडपणे टीका केली आहे.


बिहार आणि आंध्र प्रदेश कनेक्शन काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. आपल्या दीड तासाच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी अनेक घोषणा केल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयश आल्याने बिहारमधील नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड आणि आंध्र प्रदेशमधील चंद्रबाबू नायडूंच्या तेलगु देसम पार्टीच्या समर्थनाने नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळेच बिहार आणि आंध्र प्रदेशला अधिक योजना आणि निधी यंदांच्या अर्थसंकल्पामध्ये मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अर्थसंकल्पापूर्वी अनेकदा या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतल्याचं दिसून आलं होतं. 


शिंदेंनीही पाठिंबा दिला पण महाराष्ट्राला ठेंगा


बिहार आणि आंध्र प्रदेशला दिलेल्या भरघोस निधीवरुन वडेट्टीवार यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. "एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा," असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. "देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे," असंही वडेट्टीवार म्हणालेत. "महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं?" असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. 



"टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य... महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल," असा इशारा वडेट्टीवार यांनी पोस्टच्या शेवटी दिला आहे.