मुंबई : मार्चमध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे अनेकांची लग्न पुढे गेली. अनेकांच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या, हॉल बुकींग झाली होती आणि अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वकाही फिस्कटलं. लग्नाचा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी केलेला खर्च वाया गेला. त्यानंतर या कपल्सनी लॉकडाऊनच्या काळात कमी खर्चात लग्न केली. अगदी शंभर किंवा मोजक्या जणांमध्ये लग्न उरकून घेतली. ज्यांच्याकडे लग्नाचं मोठं बजेट नव्हतं त्यांनी देखील या काळात साध्या पद्धतीने लग्न केली. बजेट लग्न मनासारखं झाल्यानंतर आता बजेट हनिमूनसाठी हे कपल्स प्लान करतायत. यासाठी जवळील फिरण्याच्या ठिकाणांचा ते गुगल किंवा मित्र परिवाराकडे शोध घेत असतात. आम्ही तुम्हाला आज राज्यातील जवळच्या ठिकाणांची माहिती देणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


लोणावळा 


कमी पैशांमध्ये जास्त आनंद मिळवण्यासाठी लोणावळा हिल स्टेशनची निवड अनेकजण करतात. पहाटे उठल्यावर धुक्याची चादर अंगावर घेऊन गरमागरम चहाचा घोट घेण्याची मज्जाचं वेगळी आहे. इथे येऊन अनेक लेण्या, किल्ले आणि धबधबे एकावेळी पाहता येतात. लोहगड किल्ला, कार्ला लेण्या, तिकोना किल्ला, विसापूर किल्ला, बेज्सा लेण्या, तुंगा किल्ला पाहण्यासारखा आहे.
१७५० रुपयांपासून इथे जाण्यासाठी पॅकेज मिळतं.


पाचगणी 


महाराष्ट्रातील लोकप्रिय टूरिस्ट पॉईंट म्हणून पाचगणीची ओळख आहे. मुंबईपासून २५४ किलोमीटर तर पुण्यापासून १०४ किलोमीटरवर हे ठिकाणं वसलंय. मुंबई-पुण्याजवळी उंच ठिकाणांमध्ये पाचगणी येतं. पांडवांनी इथे काही काळ वास्तव्य केल्याचं म्हटलं जातं. ब्रिटीशांसाठी तर हे रिटायर्टमेंटनंतर आरामाचं ठिकाणं होतं. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला १६०० रुपयांपासून पॅकेज मिळतील.


गणपतीपुळे 


निसर्गरम्य वातावरणात उत्तम फिरण्याची सोय आणि देवदर्शन देखील करायचं असेलं तर गणपतीपुळे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. रत्नागिरीपासून २४ किलोमीटर, पुण्यापासून ३०७ किलोमीटर तर मुंबईपासून ३४५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाणं आहे. गणपतीपुळे मंदीराजवळ फिरायला समुद्र आणि राहण्याची सोय आहे. त्यामुळे तुमची सुट्टी इथे आनंदात जाऊ शकते. तुम्हाला इथे जाण्यासाठी ६,९०० रुपयांपासून पुढे पॅकेज दिले जातात.


माथेरान 


थंडीच्यावेळी सर्वाधिक पसंतीचं ठिकाणं म्हणून माथेरानची निवड हमखास केली जाते. मुंबईपासून ९४ किलोमीटर, लोणावळ्यापासून ५६ किलोमीटर तर पुण्यापासून १२२ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. महाराष्ट्र पर्यावरण आणि वनविभागाने हे इको सेंसेटीव्ह झोन म्हणून निवडलंय. निसर्गाच्या साखळीत महत्वाचे असणारी अनेक झाडं, लहान-मोठे प्राणी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. इथे एकाच ठिकाणी तुम्हाला ३८ व्ह्यू पॉईंट दिसतील. तुम्हाला इथे जाण्यासाठी ५,५०० रुपयांपासून पुढे खर्च येऊ शकतो.


महाबळेश्वर 


लग्न झाल्यानंतर पॉकेटला परवडेल असे पॉईंट शोधणाऱ्यांसाठी महाबळेश्वर हे उत्तम ठिकाण आहे. आता थंडीच्या दिवसात महाबळेश्वरला जाण्याइतकं सुख नाही. निसर्गाची देणं लाभलेलं महाबळेश्वर कपल्ससाठी बजेट ट्रीप आहे. मुंबई आणि पुण्यातील कपल्ससाठी पश्चिम घाटातील महाबळेश्वर उत्तम पर्याय आहे. इथे आल्यानंतर तुम्ही प्रतापगड किल्ला, वेण्णा तलाव, महाबळेश्वर मंदीर, कृष्णाबाई मंदिर, पंचगणी अशी ठिकाणं पाहू शकता. कमीत कमी २००० रुपये इतक्या खर्चात तुम्ही हा प्लान करु शकता.


इगतपुरी 


राज्यातील फिरण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणून इगतपुरीकडे साऱ्यांचा ओढा असतो. मुंबईपासून १३६ किलोमीटर, पुण्यापासून २५० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. आठवड्याच्या शेवटी इगतपुरीला जाण्याऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. मनमोहक वातावरण, मंदिर, किल्ला, तलाव, वॅली तुम्हाला इथे पाहता येईल. इथे जाण्यासाठी टुरिस्ट कंपन्या तुम्हाला तुमच्या बजेटनुसार ५,८०० किंमतीचे पॅकेज देतात.