गजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरी, खामगावात महाराज प्रगटले म्हणत भक्तांची रीघ
राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असला तरी अद्याप अशी घटनांना आळा बसलेला नाही. बुलडाण्यातल्या खामगावमध्ये संत गजानन महाराजांचा सारखा एक व्यक्ती आला आणि साक्षात गजानन महाराज प्रगटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या व्यक्तीला पाहण्यासाठी लोकांनी अक्षरश: गर्दी केली होती.
मयूर निकम, झी मीडिया बुलडाणा : गजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरीचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) तालुक्यात घडलाय. सुटाळ पुरा गावात अशोक सातव यांच्या घरी एक व्यक्ती आली. जी हुबेहुब गजानन महाराजांसारखी (Gajnan Maharaj) दिसत होती. ही व्यक्ती आल्यानंतर साक्षात महाराज प्रकटले अशी बातमी पसरली आणि या ठिकाणी बघ्यांची आणि भक्तांची गर्दी जमली. शेकडो लोकं गजानन महाराजांचा जयघोष करत दर्शनासाठी जमा झाले. ही व्यक्ती कोण आहे, कुठून आली याचा आता शोध घेतला जातोय. मात्र गजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरीच्या या प्रकाराची राज्यभर चर्चा सुरु आहे.
काय आहे नेमका प्रकार?
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील सुटाळ पुरा गावात अशोक सातव आपल्या कुटुंबासह राहातात. रविवारी रात्री त्यांच्या घरी गजानन महाराजांसारखी वेशभूषा केलेली एक व्यक्ती आली. ती व्यक्ती हुबेहुब गजानन महाराजांसारखी दिसत होती. या व्यक्तीने मला तुमच्या घरी जेवण करायचं आहे असं अशोक सातव यांना सांगितलं. सातव कुटुंबियांनी या व्यक्तीच्या जेवणाचा सोय केली. दरम्यान, या व्यक्तीला जेवताना शेजारच्या काही लोकंनी पाहिलं आणि सातव यांच्या घरी साक्षात गजानन महाराज प्रकटले अशी बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण खामगावात पसरली. अवघ्या काही मिनिटातच या व्यक्तीला पाहाण्यासाठी गावातील लोकांनी तुफान गर्दी केली. बघत-बघता सातव यांच्या घराबाहेर यात्रेचं स्वरुप आलं.
सुटाळ पुरा गावातच नाही तर आसपासच्या गावातही ही बातमी पसरली आणि लोकं मिळेल ती वाहनं पकडत सुटाळ पुरा गावात आली. गजानन महाराजांसारख्या दिसणाऱ्या त्या व्यक्तीला पाहाण्यासाटी लोकांची तुफान गर्दी झाली. लोकांनी संत गजानन महारांजाच्या नावाचा जयघोष करत त्या व्यक्तीच्या दर्शनासाठी रांग लावली. रात्री उशीरापर्यंत त्या लोकं त्या व्यक्तीचं दर्शन घेत होती. वाढती गर्दी पाहाता शेवटी पोलिसंना पाचारण करण्यात आलं.
पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं. पण ही व्यक्ती कोण? कुठून आली? याबाबात अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. पण हा प्रकार सोशल मीडियावर मात्र तुफान व्हायरल झाला.
अंनिसने केली कारवाईची मागणी
दरम्यान, अंधश्रद्धा (Superstition) पसरवणाऱ्या अशा घटनांविरोधात कठोर पावलं उचलावीत अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमद्ये अमानवीय शक्ती असल्याचं भासवून लोकांना लुबाडणं हा गुन्हा आहे. जादुटोणाविरोधी कारवाईअंतर्गत त्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी अंनिसने केली आहे.