विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण : आपण मोर्चे आंदोलने अनेक बघत असतो..मात्र  बिल्डरांनी मोर्चा काढलेला कधी बघितलाय?बिल्डरांनी अन्याय केल्याच्या तक्रारी वरून अनेक मोर्चे निघतात मात्र कल्याणात आज बिल्डरांनीच अन्याय होत असल्याविरुद्ध मोर्चा काढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखो करोडोंच्या उंची गाड्यांत फिरणारे गर्भश्रीमंत बिल्डर आज चक्क रस्त्यांवर उतरून केडीएमसीचा निषेध करत होते..कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बहुचर्चित ‘ओपन लँड टॅक्स’विरोधात येथील शेकडो बिल्डर आणि संबंधित कर्मचारी वर्ग आज रस्त्यावर उतरला होता. हा जाचक कर तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी एमसीएचआयच्या कल्याण डोंबिवली युनिटने महापालिकेवर मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला.


बाकीच्या महापालिका 60 ते 100 प्रति स्क्वेअर मिटर कर आकारात असताना केडीएमसी मात्र 1400 रुपये  प्रति स्केवर मिटर दर आकारात आहे. कल्याण पश्चिमेतील  सहजानंद चौकातून निघालेल्या मोर्चामध्ये बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, इंजिनिअर यांच्यासह कामगार वर्गही सहभागी झाल्याने या मोर्चाला विराट स्वरूप प्राप्त झाले होते.


बिल्डरांच्या शिष्टमंडळाने आयुक्त पी वेलारासु यांची भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या. दरम्यान आयुक्त पी वेलारासु यांनी लवकरात लवकर हा कर कमी करण्यासंदर्भात हालचाल सुरू असून येणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव मंजूर होऊन त्यावर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली..हा टॅक्स कमी झाल्यानंतर कल्याण डोंबिवली मधील घरांच्या किंमती 500 रुपये प्रति चौरस फूट कमी होतील असा दावा बिल्डरांनी केल्याने सर्वसामान्यांच्या दृष्टीने हा कर कमी होणे हिताचे राहणार आहे..