अटक केलेल्या आरोपीचा आला कोरोना रिपोर्ट, पोलीस स्टेशनची उडाली झोप
आरोपीच्या कोरोना रिपोर्टने उडवली अख्ख्या पोलीस स्टेशनची झोप, बुलडाण्यातल्या घटनेने खळबळ
मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : कोरोनाने (Corona) राज्यात पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 4 हजार 165 कोरोनाचे नवे रूग्ण सापडले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील सक्रीय रुग्णांचा आकडा हा 20 हजार पार गेलाय. राज्यात सध्या 20,634 जणांवर रुग्णांवर कोरोना उपचार सुरु आहेत.
राज्यात एकीकडे कोरोना परत डोकं वर काढतोय, त्यातच बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या एका आरोपीमुळे अख्ख पोलीस स्टेशन कोरोना पॉझीटिव्ह झाल्याचा हा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर उपविभागात येणाऱ्या जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये घडलाय.
दोन दिवसांपूर्वी खामगाव मेहकर रोडवरील देऊळगाव साकर्शा इथे कत्तलीसाठी गाई नेत असल्याच्या संशयावरून जमावाकडून दोन वाहनं जाळण्यात आली होती. या प्रकरणात गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला पोलिसांनी अटक केली होती. त्याला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
त्याला न्यायालयासमोर हजर करण्यापूर्वी त्याची तपासणी केली असता आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर तात्काळ कारवाईत सहभागी असलेल्या पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जानेफळ पोलीस ठाण्यातील 1 पोलीस उपनिरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 2 महिला पोलीस कर्मचारी, 5 पोलीस शिपाई आणि 1 आरोपी असे ११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
या घटनेने जिल्ह्याची आणि प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यांना विलगीकरण कक्षात जरी ठेवले असेल तरी हे पोलीस आणि सदर आरोपी अजून कुणाकुणाच्या संपर्कात आला हा मोठा प्रश्न जिल्हा प्रशासनापुढे येऊन ठेपलाय.