मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या कर्ज वसुली करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फायनान्स कंपनीसाठी (finance company) वसुली करणाऱ्या बाउन्सरकडून (bouncer) कर्ज (Loan) घेणाऱ्या व्यक्तीचे अपहरण (kidnap) करुन बेदम मारहाण केल्याचं उघड झालं आहे. कर्जदाराचा मारहाणीसोबत शारिरीक छळ देखील करण्यात आला आहे. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला 3 दिवस डांबून ठेऊन शरीरावर सिगारेटचे चटके सुद्धा देण्यात आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. (buldhana Borrower kidnapped by finance company agent) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जाच्या वसुलीसाठी कर्ज घेणाऱ्याचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शेगावात (shegaon) उघडकीस आली. कॅपिटल नावाच्या कंपनीकडून शेगाव येथील अश्फाक खान मेहता खान या 32 वर्षीय युवकाने बोलेरो वाहनासाठी कर्ज घेतले होते. मात्र वाहनाचा व्यवसाय मंदीत असल्याने अश्फाक खानने हे वाहन अकोला येथे एकाला विकले आणि कायदेशीररित्या त्याच्याकडून नोटरी करून कर्जाची रक्कम ती व्यक्ती फेडेल असा करार केला. मात्र त्या व्यक्तीने फायनान्स कंपनीकडे रक्कम भरली नसल्याने रविवारी खामगाव येथील चार जणांनी शेगावात येऊन अश्फाक खान याला रेल्वे स्टेशन जवळ थांबवून त्याचे अपहरण केले. त्यानंतर शेगावातील विश्रामभवनात अश्फाकला रात्री उशिरापर्यंत जबरदस्त मारहाण केली. 


यानंतर अश्फाकला मोटरसायकलवर बसवून खामगाव शहरातील शंकर नगर भागातील एका घरात नेऊन तिथे दाबून ठेवले. यानंतर चौघांनी पुन्हा एकदा अश्फाकला मारहाण करत संपूर्ण शरीरावर सिगारेटचे चटके दिले. दिवसभर अश्फाकवर अत्याचार करण्यात येत होते. सलग तीन दिवस अश्फाकचे हातपाय बांधून त्याला मारहाण केली जात होती.


यानंतर त्याच्याकडून  सात लाखांच्या दोन चेकवर सही करुन घेतली आणि त्याचा व्हिडीओ काढण्यात आल्याचे अश्फाकने सांगितले. गाडी परत आणून देतो या आश्वासनानंतर गंभीर जखमी असलेल्या अश्फाक खानला खामगावच्या बस स्थानकावर शंभर रुपये देऊन सोडून देण्यात आले. अश्फाकने शेगाव गाठल्यानंतर मंगळवारी रात्री सर्व हकीकत आपल्या नातेवाईकांना सांगितली. यानंतर बुधवारी शहर पोलिसात तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार आरोपी विजय काळे, मंगेश तायडे, प्रवीण बोदडे आणि आणखी एका अनोळखी इसमांविरुद्ध अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.