मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana Crime) शहरालगतच्या राजूर घाटात (Rajur Ghat) एका 35 वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून  या प्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात (Buldhana Police) आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही तिच्या एका मित्रासोबत खडकी येथे राजूर घाटातून दुपारी जात होती. त्याचदरम्यान हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. स्थानिक आमदार संजय गायकवाड यांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात ठाण्यात धाव घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी पीडित महिला आणि तिचा मित्र थांबले होते. या वेळी त्या ठिकाणी आठ जणांचा घोळका आला. त्यांनी तक्रारकर्त्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील 45 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पीडित महिलेला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान ही  घटना समजताच आमदार संजय गायकवाड यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास बोराखेडी पोलीस ठाणे गाठले. सोबतच पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता. जोपर्यंत प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे न सोडण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणात गांभीर्याने कारवाई सुरू केली.


"राजूर घाटात गेल्या महिन्याभरात बलात्काराच्या सहा घटना घडलेल्या आहेत. राजूर घाटात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोघांना एका आठ जणांच्या टोळक्याने मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार केला. आठ जणांच्या टोळक्याने तक्रारदाराला खाली पाडलं आणि मारहाण केली. त्यानंतर त्या महिलेवर तक्रारदारासमोर आठ जणांनी बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर तक्रारदाराने आरोपीचा पाठलाग केला तेव्हा तो मोहेगावमध्ये गेला. त्या आरोपींमध्ये राहुल राठोड नावाचा एक व्यक्ती असल्याचे गावातल्या लोकांनी सांगितले. गुन्हेगार हे बाहेरगावचे असून या गावात आले आहेत. आधी देखील एक भारतीय सैन्यातील जवान सुट्टीवर आल्यानंतर पत्नीसह तिथे आला होता. अचानक पणे असेच काही लोक आले आणि त्यांनी जवानाला बांधून त्याच्या समोरच पत्नीवर बलात्कार केला. या घटनेतही एका ग्रामपंचायत सदस्याने पोलिसांना बलात्काराची माहिती दिली. घाटात आणि पोलीस ठाण्यात 15 मिनिटांचे अंतर आहे. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याला ही माहिती देण्यात आली होती. पण त्याने कोणालाही सांगितले नाही आणि तो सुद्धा घटनास्थळी गेला नाही. बलात्कार संपल्यानंतर आरोपी पळून गेले त्यानंतरही पोलीस पोहोचले नाहीत," असा गंभीर आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला.