COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयूर निकम, झी २४ तास, बुलढाणा : बुलढाण्यातल्या एका नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं... आता यात काय बातमी, असं तुम्ही म्हणाल... तर या भांडणांचं कारण ठरली ती कोंबडीची अंडी.... हे भांडण एवढं वाढलं, एवढं विकोपाला गेलं की, प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं. बुलढाण्यातला अंडे का झगडा सध्या चर्चेत आहे.


संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे... कारण अंडी शरीरासाठी पोषक असतात. पण याच अंड्यावरून बुलढाण्यात साखरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठं महाभारत घडलं... त्यांचं झालं असं की, एक नवरा घरी दोन अंडी घेऊन आला. त्यानं बायकोला अंड्याची भाजी बनवायला सांगितली. 


नवऱ्याला अंड्याची भाजी करून देण्याऐवजी बायकोनं ती अंडी मुलीला खाऊ घातली. मग काय, नवरोबांचा राग अनावर झाला... आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वाद एवढा वाढला की प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं.



अंड्यावरून सुरू झालेलं हे नवरा बायकोचं भांडण ऐकून पोलिसांनी डोक्याला हातच लावला. हा विचित्र तंटा कसा मिटवायचा, मोठा पेचच होता... पण पोलिसांनी अफलातून अंडे का फंडा शोधला.


पोलीसांनी दोघांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. दोघांची वेगवेगळी बाजू होती. अंड हेच भांडणामागचं कारण आहे हे त्यानंतर पोलिसांना स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी स्वत:कडून दोन अंडी देत दोघांचं भांडण मिटवलं. दोघेही आनंदाने अंडी हातात घेऊन घरी गेले. 


अंडी आणि त्यावरून झालेलं अनोखं भांडण आणि पोलिसांनी शोधलेली अफलातून आयडिया.. पुढच्या वेळी घरात अंडी आणाल, तेव्हा हा किस्सा आठवून हसू आल्याशिवाय राहणार नाही.