मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : ६ सप्टेंबर रोजी बुलढाण्याजवळ असलेल्या गिरडा जंगलामध्ये शेकडोंच्या संख्येत मृत कुत्र्यांना आणून टाकले होते. यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान तपासामध्ये पोलिसांना जास्त शोधाशोध करावी लागलीच नाही. कारण आरोपी शेजारच्या जिल्ह्यातीलच निघाले. जालना जिल्ह्यातील भोकरदन मधून पाच जणांना पोलिसांनी यासंदर्भात अटक केली आहे. नगरपालिकेअंतर्गत कुत्र्यांना मारण्याची मोहीम राबवण्यात आल्याचं आरोपींनी सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी भोकरदन येथील सिद्धेश्वर नारायण गायकवाड (२८) अनिल वसंत गायकवाड (२१), संतोष सीताराम शिंदे (३८), शेख सलीम शेख शोकात (३२), विष्णू उर्फ बाबासाहेब सूर्यभान गायकवाड (३४) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर या आरोपींनी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या आदेशाने शहरातील श्वान पकडण्याची मोहीम राबविली होती. तसेच नगरपरिषदेच्या स्वच्छता वाहनातून श्वानांना मारहाण करुन त्यांचे पाय बांधून गिरडा जंगलात आणून टाकले, अशी माहिती दिली. 



या प्रकरणात पुढे भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.