बुलढाण्यातील शेतकरी महिलेच्या डोळ्यातून काढल्या 60 जिवंत अळ्या! शेतात काम करताना अचानक...
60 Live Worm Removed from Woman`s Eye: वेळीच बुलढाण्यामाधील या महिलेची चाचणी करुन तिला उपचार मिळाल्याने तिचा डोळा आणि दृष्टीही वाचली आहे.
60 Live Worm Removed from Woman's Eye: बुलढाण्यामध्ये आरोग्यविषयक क्षेत्रातील एक फारच विचित्र प्रकार समोर आला असून एक लाखांमध्ये एखाद्याच ही अशी समस्या उद्भवते. बुलढाण्यातील एका नेत्रालयामध्ये डॉक्टरांनी एका महिलेच्या डोळ्यातून तब्बल 60 जिवंत अळ्या बाहेर काढल्या आहेत. वेळीच या महिलेला उपचार मिळाले आणि तिच्यावर दोन तासांपर्यंत उपचार करुन या आळ्या काढण्यात आल्याने सुदैवाने तिचा डोळा वाचला असून हे प्रकरण चिखलीमधील मोरवाल हॉस्पिटलमधील आहे.
2 तासांमध्ये डोळ्यातून काढल्या 60 आळ्या
ज्या महिलेच्या डोळ्यातून 60 जिवंत अळ्या काढण्यात आल्या आहेत तिचं नाव ज्योती गायकवाड असं असून त्या चिखली तालुक्यामधील मालगणी येथील रहिवाशी आहेत. मोरवाल रुग्णालयामध्ये प्रसिद्ध नेत्र रोगतज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेवर शस्त्रक्रीया केली. या महिलेच्या डोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत आळ्या आढळून आल्यानंतर एक एक करुन त्या काढण्यासाठी तब्बल 2 तासांचा वेळ लागला. खास बाब म्हणजे या किचकट आणि तितकीच जोखीम असलेली ही शस्त्रक्रीया डॉक्टर स्वप्नील यांनी मोफत केली.
नेमकं या महिलेबरोबर काय घडलं?
सदर महिला ही शेतात मोलमजुरी करताना अचानक तिच्या डोळ्याला मातीचं ढेकूळ लागलं. त्यावेळी तिच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नव्हती. मात्र या छोट्याश्या घटनेनंतर वारंवार ज्योती यांच्या डोळ्यात जळजळ व्हायची. अचानक डोळ्यात काहीतरी टोचत असल्याप्रमाणे वेदना व्हायच्या. दिवसोंदिवस हा त्रास वाढत गेला. अखेर या महिलेने डॉ. स्वप्नील यांच्याकडे तपासणी करुन घेतली असता महिलेच्या डोळ्यात न दिसणाऱ्या जखमेमुळे अळ्या झाल्याचं स्पष्ट झालं. या अळ्या तात्काळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
महिलेची दृष्टी उत्तम
एक एक करत या महिलेच्या डोळ्यातून डॉक्टर स्वप्नील यांनी तब्बल 60 जिवंत अळ्या बाहेर काढल्या. या महिलेची प्रकृती आता स्थीर असून तिच्या डोळ्यांना कोणताही त्रास नाहीये. तिची दृष्टीही उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्या या विचित्र केसची जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा आहे.
अधिक संवेदनशील अवयव
अनेकदा अशाप्रकारच्या छोट्यामोठ्या अपघातांमध्ये वरवर कोणतीही जखम दिसत नसली तरी त्याचा परिणाम अंतर्गत भागात होतो आणि अशा समस्या निर्माण होतात. डोळा हा मानवी शरीरामधील फार नाजूक आणि तितकाच संवेदनशील भाग असल्याने त्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. डोळ्यांना अगदी छोटी इजा झाली तरी त्यासंदर्भात दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. म्हणूनच थोडा जरी त्रास जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं तज्ज्ञ सूचवतात.