IIT ची नोकरी सोडून इंजिनियर राबतोय शेतात; विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या समस्येवर शोधला भन्नाट उपाय
Buldhana News : IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून एका तरुण इंजिनियरनं शेती आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात एक महत्वाचं पाऊल उचललंय. पश्चिम विदर्भातील शेतीमध्ये प्रयोग करण्याचा निर्णय घेतलाय.. त्याचा हा शेतीमधील प्रयोग शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
Maharashtra Farmer Success Story : पश्चिम विदर्भात कपाशी आणि तुरीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.. वारंवार तीच पिकं घेऊन जमिनीचा पोत बिघडतो.. यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात घट होते. अशामध्ये शेतातल्या वेस्ट मटेरियलपासून बेस्ट प्रॉडक्ट तयार करण्याची कल्पना बुलढाण्यातील एका तरुण इंजिनिअरला सुचली आणि मग काय. परसराम आखरे नावाच्या या ध्येयवेड्या इंजिनियरनं आयआयटीची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून थेट शेतीत प्रयोग करण्याचं काम सुरु केलं. पराटी आणि तुरीच्या फेकून दिल्या जाणा-या खुंट्यांपासून त्यांनी बायोचार निर्मितीला सुरूवात केली आहे.
बायोचार म्हणजे उच्च तापमानावर ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत तयार केलेला जैविक पदार्थ आहे. बायोचार म्हणजे शेतीमधील कचरा, पालापाचोळा, गवत जाळून तयार केलेले एक प्रकारचे कोळसासदृश्य मिश्रण आहे. परसराम आखरे नावाच्या इंजिनियरनं पदवी घेतल्यानंतर काही वर्ष आयआयटी आणि मंत्रालयात काम केलं. मात्र, शेतीत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे जमिनीचं प्रदूषण आणि शेतक-यांची खालावत जाणारी आर्थिक स्थिती त्यांना अस्वस्थ करत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून बायोचार बनवण्याचा निर्णय घेतला.
बायोचार जमिनीत टाकल्यानं जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. सूक्ष्मजिवांसाठी पोषक वातावरण तयार होते. रासायनिक खतांचा वापर कमी करता येतो. बायोचार वापरल्यानं पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. बायोचार बनवण्यासाठी शेतीमधील कचरा वापरला जातो. कचरा जाळल्यानं होणारे प्रदूषण टाळता येते.
या बायोचारला बुलढाणा जिल्ह्यातील शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागलाय. अनेक शेतकरी आता रासायनिक खतांचा वापर कमी करुन बायोचार वापरण्यासाठी सरसावलेत. परसराम आखरे या तरुण इंजिनियरची बायोचारच्या उत्पादनात वाढ करण्याचा हा प्रयोग फायदेशीर ठरलाय.. आता बायोचार वापराचे फायदे आणि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे.. त्यांच्या या प्रयत्नांमुळे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळणार आहे, तसंच शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारायलाही मदत होणार आहे.