ठाणे : डोंबिवलीतील दोन व्यावसायिकांचे मलेशियातील क्वालालांपूर येथे अपहरण झालं आहे. अनोळखी व्यक्तींकडून गुरुवारी रात्री एक कोटीच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आले आहे. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी या व्यावसायिक बंधूंना देण्यात आली आहे. या प्रकरणाची तक्रार भारतीय राजदूताकडून मलेशिया सरकार आणि ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे वैद्य कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहन प्रकाश वैद्य आणि कौस्तुभ प्रकाश वैद्य अशी अपहरण झालेल्या व्यावसायिकांची नावे आहेत. ते डोंबिवली पूर्वेतील शिवम रुग्णालयामागील सेंट्रल रेल्वे को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत राहतात. या अपहरणाची तक्रार अपहृत मुलांचे काका राजीव वैद्य यांनी रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. कौस्तुभ आणि रोहन हे रॉक फ्रोझन फूड नावाने फ्रोझन फिश विक्रीच्या व्यवसायात आहेत. मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड देशात मध्यस्थ म्हणून काम करतात. या व्यवसायासाठी ते नियमित परदेशात ये-जा करतात. २ ऑगस्ट रोजी ते मलेशियातील ‘मीस ली फ्रोझन फूड’ कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर व्यावसायिक चर्चा करण्यासाठी गेले आहेत. त्यांचे वास्तव्य तेथील ग्रॅन्ट आर्चेड हॉटेलवर होते. ते डोंबिवलीतील कुटुंबीयांच्या संपर्कात होते.



संध्याकाळी सहा वाजताची कंपनीबरोबरची बैठक झाली. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता घाबऱ्या आवाजात कौस्तुभ, रोहन यांनी डोंबिवलीत वडिलांना संपर्क करून आमचे अपहरण झाले आहे. एक कोटी रुपये अपहरणकर्ते मागतात असे सांगू लागले. ३ ऑगस्ट रोजी अपहरणकर्त्यांनी प्रकाश वैद्य यांना ११ वेळा संपर्क करून खंडणीची मागणी केली. सून सायली कौस्तुभ वैद्य यांनी ही माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांना दिली असून पुढील तपास ठाणे खंडणी विरोधी पथक करत आहेत.