प्रणव पोळेकर, झी मीडिया, चिपळूण : चिपळूणमधल्या कापड दुकानांबाहेर सध्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. अगदी एखाद्या सणासुदीला गर्दी व्हावी, तशी. याला कारणीभूत ठरला आहे तो नुकताच येऊन गेलेला महापूर. या पुरात भिजलेले कपडे स्वस्तात खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा पूर आल्याचं दृश्यं इथं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापुरात चिपळूणची बाजारपेठ संपूर्ण पाण्याखाली होती. त्यामुळे बहुतांश माल भिजून गेलाय. जे काही थोडेफार कपडे शिल्लक आहेत, ते वाळवून विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. साधारणतः 25 टक्के किंमत आली तरी खूप झालं, अशी अवस्था आहे.


महापूरात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शासनाकडून अजूनही मदत मिळालेली नाही, अशी तक्रार दुकानदार करतायत, पूरात ओला माल कसा विकायचा प्रश्न दुकानदारांसमोर पडलाय. इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी कागदपत्रही उरलेली नाहीत, ती ही पाण्यात वाहून गेली आहेत, त्यामुळे दुकानदार संकटात सापडला आहे. शासनाने लवकर मदत करावी अशी मागणी दुकानदार करत आहेत.


महापुरानं सगळ्यांचंच नुकसान झालंय. किंमत पाडून माल विकत झालेलं नुकसान भरून काढण्याचा व्यापारी प्रयत्न करतायत. दुसरीकडे पुरात संपूर्ण संसार वाहून गेलेल्यांना स्वस्तातल्या कपड्यांमुळे काहीसा दिलासाही मिळतोय.