बुलढाणा : राज्यातल्या वन्यजीव प्रेमींमध्ये सध्या सी-वन नावाच्या वाघाची चर्चा आहे. कारण हा वाघोबा जोडीदाराच्या शोधात तब्बल सहा जिल्हे आणि तेराशे किलोमीटर फिरलाय. यवतमाळ जिल्ह्यातल्य़ा टिपेश्वर अभयारण्यातील टी-१ वाघिणीचा बछडा २०१६ साली जन्मला. हा वाघ त्याच्या नव्या हद्दीच्या आणि जोडीदार वाघिणीच्या शोधात टिपेश्वर अरण्यातून बाहेर पडला. साधारण वाघ ४०० किलोमीटरच्या परिसरात फिरत असतो. पण सी-वन वाघानं कमाल केली. तो चक्क ६ जिल्हे आणि १३०० किलोमीटरचं अंतर फिरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिपेश्वर अभयारण्यातून निघालेला हा वाघ पांढरकवड्यात दिसला. नंतर तो आंध्र प्रदेशातल्या आदिलाबादच्या जंगलात गेला. तिथून त्यानं नांदेड  विभागातल्या पैनगंगा अभयारण्याकडं मोर्चा वळवला. तिथही त्याचं मन रमलं नाही. तो  पुसद विभागातल्या इसापूर अभारण्यात गेला. इसापूरमधून निघालेला सी-१ वाघ हिंगोली वाशिममध्ये दिसला. आता त्याचा मुक्काम बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्यात आहे.


सी-1 वाघानं १३०० किलोमीटरच्या प्रवासात शेकडो गावं ओलांडली. काही ठिकाणी त्यानं गुरढोरांची शिकार केली. पण माणसाच्य़ा वाटेला तो गेला नाही. सी-१ वाघानं ज्या भागातून प्रवास केला त्या भागात फार मोठं जंगल नाही. सी-वनचा हा प्रवास वन्यजीव अभ्यासकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


ज्ञानगंगा अभयारण्यात तरी सी-वन वाघाचा शोध संपतो का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात त्याला त्याची जोडीदार वाघीण सापडली तर येते काही दिवस त्याचा मुक्काम पोस्ट ज्ञानगंगा अभयारण्यच असेल यात शंका नाही.