नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात राज्यभरात आंदोलनं करणाऱ्या आंदोलकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांततेचं आवाहन केलंय. हा कायदा अस्तित्वात आणल्यानंतर आपल्याला देशातून हाकलून दिलं जाईल अशी भीती अनेकांना वाटतेय.. मात्र महाराष्ट्रात कोणत्याही समाजाच्या हक्काला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही ठाकरेंनी दिली... जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी सरकार समर्थ आहे, राज्याची शांतता बिघडवू देऊ नका, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र शांत राहावा यासाठी विविध घटकांशी मी संवाद साधत आहे. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवा. अनेकांना हा कायदा अस्तित्वात आणल्यानंतर आपल्याला देशातून हाकलून दिलं जाईल, अशी भीतीत वाटतेय. मात्र, महाराष्ट्रात कोणत्याही समाजाच्या हक्काला धक्का लागू देणार नाही, असं वचन मी देतो. महाराष्ट्रातील शांतता भंग होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी, असं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. कोणत्याही समजातील, धर्मातील लोकांनी मनात गैरसमज ठेवू नये... आपापसांत विष कालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बळी पडू नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडलं गेलं तेव्हा शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र, राज्यसभेत कुठलीही भूमिका घेण्याचं टाळतं शिवसेना खासदारांनी सभात्याग केला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागरिकत्व सुधारणा कायद्यावर जाहीररित्या बोलताना दिसले.


 


पुणे, औरंगाबादमध्ये मोर्चे


नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलनं पाहायला मिळाली. नागपूरसह पुणे आणि औरंगाबादेत भव्य मोर्चे काढण्यात आले. हजारोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, परभणी या शहरांमध्येही विशाल मोर्चे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांमध्ये विद्यार्थी आणि तरुण आणि महिलांचा मोठा सहभाग होता.



बीडमध्ये दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज 


सीएए विरोधात बीडमध्ये शुक्रवारी बंदचं आवाहन करण्यात आलं. पण, यादरम्यान जमावानं बसवर दगडफेक केली. त्यानंतर शिवाजी चौकात पळापळ झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.  जमावाच्या दगडफेकीत बसचे मोठे नुकसान झालं. नागरिकत्व कायद्याविरोधात आज बीडमध्ये बंद पाळण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात बंद पाळून या कायद्याला विरोध करण्यात येतोय. काल विद्यार्थी संघटनेकडून आक्रोश मोर्चा काढल्यानंतर आज बीड शहरातील बशीरगंज, माळीवेस, धोंडीपुरा, कारंजा परिसर कड़कडीत बंद ठेवण्यात आला आहे तर शहरातील सुभाष रोडवरील मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कायद्याविरोधात देशभरात पडसाद उमटत असताना बीडमध्ये खबरदारी म्हणून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवला. तरीही दगडफेकीची घटना घडलीच.