बारामती: नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीमुळे ( एनआरसी) उत्तर आणि दक्षिण भारतात मोठा संघर्ष निर्माण होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते रविवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला होता. संसदेत त्याबद्दलची भूमिकाही मांडली. आता त्यावरूनच देशात आग लागेल आणि संघर्षाचे वातावरण निर्माण होईल, असे पवारांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा अॅक्टविरोधात आंदोलन


नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारत पेटला आहे. हे लोण आता दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही पसरले आहे. दक्षिण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात रविवारी यावरून मोठा हिंसक संघर्ष झाला. रविवारी सायंकाळी काढलेल्या मोर्चादरम्यान काही समाजकंटकांनी दिल्ली पर्यटन महामंडळाच्या बससह तीन बस, काही मोटारी आणि अनेक दुचाकी पेटवल्या. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलिसही जखमी झाले. यानंतर पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून विद्यापीठाच्या आवारात अश्रुधुराचा मारा करण्यात आला. तसेच अनेक आंदोलकांना विद्यापीठाच्या परिसरातून अक्षरश: फरफटत बाहेर काढण्यात आले. कालच्या कारवाईदरम्यान पोलिसांनी १०० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, आज पहाटे या सर्वांची सुटका करण्यात आली. 


आसाममध्ये अद्यापही तणाव असून, लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. पोलिसांच्या गोळीबारातील दोन जखमींचा मृत्यू झाल्याने आंदोलनात जीव गमावलेल्यांची राज्यातील संख्या चार झाली आहे. राज्यातील मालदा, मुर्शिदाबाद, हावडा, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण २४ परगणा या पाच जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.