अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : देशात सर्वत्र मंदीचं सावट असताना पुण्यातील वाहन विक्री मात्र तेजीत आहे. दिवाळीच्या अवघ्या 3 दिवसांत शहरात वाहनांची विक्रमी नोंदणी झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- 13 हजार 885 दुचाकी


- 1 हजार 832 चारचाकी


- 910 इतर स्वरूपाची वाहनं


- एकूण संख्या 16 हजार 627


ही आकडेवारी आहे पुण्यात दिवाळीच्या मुहूर्तावर नोंद झालेल्या वाहनांची. यंदा दस-याच्या दिवशी झालेल्या नोंदणीचा विक्रम दिवाळीनं मोडलाय. यावरुन पुण्यात वाहन खरेदी विक्री क्षेत्रात शब्दशः दिवाळीच साजरी झालीय. आधीच वाहतूक कोंडीची गंभीर समस्या असलेल्या पुण्यातल्या रस्त्यांवर 16 हजाराहून अधिक वाहनांची भर पडलीय. वाहनाच्या खरेदी विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्य सरकारला यातून कोट्यवधीचा महसूलही मिळतो... असं असताना वाहनांच्या वाढणाऱ्या संख्येला काय म्हणावं? हा प्रश्न आहे.


आजघडीला पुणे-पिंपरी चिंचवडमधील एकूण नोंदणीकृत वाहनांची संख्या 50 लाखांवर पोचलीय. केवळ पुण्यात वर्षाकाठी 2 लाखांपेक्षा अधिक वाहनांची नोंदणी होते. शहरात 2015 - 16 मध्ये 2 लाख 21 हजार 552 तर 2016-17 मध्ये 2 लाख 65 हजार 367 वाहनांची नोंदणी झाली. याचा अर्थ वाहन संख्येतील वृद्धीदर सरासरी 15 टक्के आहे. एकूण 50 लाख लोकसंख्येच्या शहरात सुमारे 40 लाख वाहनं आहेत. हे प्रगतीचं लक्षण म्हणायचं की अपरिहार्यतेचं याचा विचार होणं गरजेचं आहे.