गाडीची कागदपत्र आता `डीजी लॉकर` या अॅपवर
गाडी चालवताना कागदपत्र आवश्यक नाहीत
मुंबई : गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स किंवा गाडीची कागदपत्र सोबत नाहीत म्हणून बऱ्याचदा आपल्यावर दंड भरण्याची वेळ येते. मात्र यापुढे पुण्यात त्याची आवश्यकता भासणार नाही. गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी पकडलं तर पहिला प्रश्न असतो , लायसन्स कुठे आहे. ते असेल तर गाडीचं आरसी टीसी दाखवा. आणि यातलं काहीजरी नसलं की शे - पाचशेच्या भुर्दंड बसलाच समजा...
आता यापुढे मात्र चिंता करण्याची गरज नाही. मोबाईलवरच्या डीजी लॉकर या अॅपवर ही सगळी कागदपत्रं उपलब्ध असणार आहेत. पहिल्या टप्प्यात २००६ नंतरची लायसन्स आणि आरसी अॅपमध्ये उपलब्ध असतील. त्यापूर्वीची लायसन्स आणि आरसी स्कॅन करून डिजिटल सहीसह अॅपवर अपलोड करता येणार आहेत. वाहतूक पोलिसांनी त्यांची मागणी केल्यावर त्यांना अॅपवरुन डिजिटल डॉक्युमेंट्स दाखवता येणार आहेत. क्यू आर कोड च्या माध्यमातून त्या कागदपत्रांची पडताळणी करता येणार आहे.
सध्या देशातली २४ कोटी वाहनं आणि ४० कोटी लायसन्सचा डेटा या अॅपवर उपलब्ध आहे. डीजी लॉकर हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ते डाऊनलोड केल्यानंतर आधार क्रमांक तसंच मोबाईल क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करता येतं. त्यानंतर युजर नेम आणि पासवर्डच्या माध्यमातून या अॅपचा वापर करता येतो. याविषयीची संपूर्ण माहिती https://digilocker.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. डिजिटल तसंच पेपरलेस कामकाजाच्या दृष्टिकोनातून टाकण्यात आलेलं हे अतिशय महत्वाचं पाऊल म्हणता येईल.