New Year Celebration : अवघ्या एका दिवसानंतर जगभरात नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. अनेकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. खाण्यापिण्याची आवड असणाऱ्यांनी आपल्या आवड्या पदार्थांचा आस्वाद घेत नववर्षाचे स्वागत करण्याचे ठरवले आहे. अशातच मटण, चिकन, मासे यासारख्या  खाण्याच्या पदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागणीचा पुरवठा करण्यासाठी भेसळ होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना आपण भेसळयुक्त तर खात नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्याचा दिवस सरत्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस ठरणार आहे. उद्या संध्याकाळपासून सर्व हॉटेल्स बार पब नागरिकांच्या जल्लोषात ओसंडून वाहणार आहेत. त्यामुळे चिकन, मटण आणि माशांची मोठी मागणी असणार आहे. विशेषतः फिश फ्राय सारख्या पदार्थांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. मात्र यादरम्यान तुमची फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासे खाताना काळजी घ्या.


वाढत्या मागणीमुळे विषारी पाण्यातील मासे तुमच्या ताटात येण्याची शक्यता आहे. मत्स्यविभागाने नुकताच अहमदनगर परिसरातून मुंबईकडे वाहतूक होत असलेल्या 50 टन माशांचा ट्रक पकडला आहे. या ट्रकमध्ये मांगुर जातीचे मासे आढळून आले. मात्र ते विषारी पाण्यातील होते हे तपासानंतर उघड झाले आहे.


भारतामध्ये देशी आणि विदेशी मांगुर असे माशांचे दोन प्रकार आहेत. विदेशी मांगुर म्हणजे प्रदूषित पाण्यात वाढलेल्या माशाची जात आहे. या माशांमध्ये रासायनिक अंश आणि मेटलचे प्रमाण सर्वाधिक असते. हा मासा कापला तर त्याचा काप सुरमयी माशासारखा दिसतो. तर चवीला हा मासा तिलापिया सारखा आहे. चविष्ट असल्याने या माशाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र तो कोणत्या जातीचा आहे हे जाणून न घेता खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते