माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नीलेश राणे निवडणूक लढवत आहेत. शिवीगाळ आणि आरडओरडा करीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातखंबा एस. एस. टी पॉईंट येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या चेकपोस्टवर गाडीची पोलिसांकडून तपासणी करीत असताना शिवीगाळ करत धमकी दिली. राणे यांनी शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी स्वाभिमानचे सोबत असणाऱ्या १६ जणांवर ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचे सर्व चित्रण व्हिडीओ कॅमेरात करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांची गाडी या चेकपोस्टवर तपासत असताना वादावादीला सुरुवात झाली. दरम्यान या चेकपोस्ट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप आले असता त्यांना देखील नीलेश राणे यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ केली, असे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.