पुण्यातील डुप्लिकेट सीएमवर गुन्हा दाखल, वाचा काय आहे कारण...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आला आहे
पुणे: पुण्यातील डुप्लिकेट सीएम विजय माने (Duplicate CM Vijay Mane) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Bund Garden Police Station) डुप्लिकेट सीएम विजय माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. डुप्लिकेट सीएम विजय माने यांनी आरोपी शरद मोहोळ याच्यासोबत एक फोटो काढून तो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल देखील केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांचा वेश परिधान करत अनेक ठिकाणी विजय माने नाचले देखील होते.
आरोपी शरद मोहोळ याच्यासोबत फोटो व्हायरल झाल्याने पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. समाजात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करण्यात आलाय.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखीच दाढी, तसाच गॉगल आणि फेटा घातलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. विजय माने नावाच्या तरुणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गणपतीच्या काळात आरतीची अधिक आमंत्रणे येत असल्याने तो अधिक चर्चेत देखील आला होता.