अमर काणे, झी मीडिया, नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या समोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. मनी लॉण्ड्रींग (Money Laundering) प्रकरणी सीबीआयने (CBI) आज अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानी छापे टाकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्स परिसरातल्या घरात सकाळी साडेसात वाजता सीबीआयचं पथक दाखल झालं होतं. अनिल देशमुख यांच्या घरातील उपस्थिती बाहेर कुणाला कळू नये म्हणून सीबीआयच्या पथकाने आपल्या गाड्या अनिल देशमुख यांच्या घरापासून काही अंतरावर पार्क केल्या होत्या. तसंच त्यांनी स्थानिक पोलिसांनाही कुठलीही सूचना दिली नव्हती. 


सकाळी साडेसात वाजता आतमध्ये गेलेलं सीबीआयचे पथक संध्याकाळी चार वाजता बाहेर पडले. सुमारे साडे आठ तास अनिल देशमुख यांच्या घरी तपास केल्यानंतर सीबीआयचं पथक बाहेर पडला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांची बराच तारांबळ उडाली. 


अनिल देशमुख यांच्या घरातून बाहेर निघताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सीबीआयने नेमकी याठिकाणी कोणती कारवाई केली याची कुठलीही माहिती प्रसारमाध्यमांना दिली नाही. मात्र, सीबीआयचे अधिकारी काही मोठ्या पिवळ्या एनव्हलपमध्ये तसंच एका पांढऱ्या कपड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दस्तावेज सोबत घेऊन गेले. ते नेमके कोणते दस्तावेज आहे हे जरी स्पष्ट नसलं तरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणातून काही दस्तावेज जप्त केले आहे, हे स्पष्ट होत आहे.


दरम्यान, सकाळी अनिल देशमुख यांच्या घरात सीबीआयचे अधिकारी दाखल झाल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळताच सकाळी 11 वाजल्यापासून पक्षाचे अनेक कार्यकर्ते अनिल देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करत केंद्र सरकार आणि सीबीआयचा निषेध करत होते.  सीबीआयचे अधिकारी बाहेर पडत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, नियम मोडून रस्ता अडवून सीबीआयच्या पथकाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुमारे 15 ते 18 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.