मुंबई : खाण्यासाठी जन्म आपुला असं म्हणत अनेकजण विविध खाद्यपदार्थांवर ताव मारतात. मुख्य म्हणजे खवय्यांच्या मनावर राज्य करणं हे तितकं सोपं नसलं तरीही ते कठीण तर मुळीच नाही. हे सिद्ध करुन दाखवलं आहे शेफ विष्णू मनोहर यांनी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध पद्धतींच्या खाद्यपदार्थांना तितक्याच शिताफीने आणि चवीने बनवणाऱ्या शेफने एक अनोखं आव्हान हाती घेतलं असून, त्या दृष्टीने पावलं उचलण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे. 


हे आव्हान म्हणजे खिचडी बनवण्याचं. मुळात खिचडी हा सर्वाच सोपा पदार्थ, त्यात कसलं आव्हान असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? इथे खिचडी बनवण्यालाआव्हान म्हणण्याचं कारण म्हणजे, तिचं प्रमाण. 


नागपुरात एक आगळावेगळा विश्वविक्रम साकारला जाणार आहे. जेथे या ठिकाणी तीन हजार किलो खिचडी बनवली जातेय.


नागपूरचेच असणारे शेफ विष्णू मनोहर ही चवदार खिचडी बनवत आहेत. रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून या खिचडी बनवण्याच्या या विक्रमाला सुरूवात झाली आहे. 


खिचडीला जागतिक दर्जा प्राप्त व्हावा यासाठी जागतिक खाद्य दिनाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आलं आहे. 


मागील वर्षी बाराशे किलो खिचडी बनवली होती. यंदा तीन हजार किलो खिचडी बनवण्यास त्यांनी सुरुवात केलीय. ही खिचडी बनवण्यासाठी पाचशे दहा किलो वजनाची कढई वापरण्यात येतेय. या खिचडीचं नागरिकांना मोफत वाटपही करण्यात येणार आहे.