प्रणव पोळेकर, रत्नागिरी :  देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करीत आहोत. आजही राज्यातील कानाकोपऱ्यातूनही नागरिकांना भयावह गैरसोयींना समोरे जावे लागते हे दिसून येतं. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातून समोर आली आहे. वरवेली गावातील एका व्यक्तीची अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क कंबरेपर्यंतच्या पाण्यातून जावे लागले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे देश स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असतानाच आजही ग्रामीण भागात अनेक महत्वाच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. या सोयी सुविधेकडे शासन व लोक प्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना आता मरणानंतरही हाल भोगावे लागत आहेत. मृत्यूनंतर तरी शासन आम्हाला सुखाने मरण देईल का असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे.


गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील नागरिकांना नदी ओलांडून स्मशान भूमीकडे अंत्यविधीसाठी प्रेतयात्रा न्यावी लागत आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसून प्रेतयात्रा नेताना नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात स्मशानभूमीचा विकास करणे हे दूरच परंतू तिथपर्यंत पोहचण्याचा साधा रस्ता देखील उपलब्ध नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.


नागरिकांच्या पायाभूत सुविधांकडे शासनाचे दूर्लक्ष इतके आहे की, मृत्यूनंतरही मरण यातना भोगाव्या लागत आहेत. अशा परिस्थितीमुळे लोकांना जिवंतपणीच मरणाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे वरवेली तेलीवाडीच्या स्मशान भूमी लगत असणाऱ्या नदीवर पूल बांधून मिळावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.