केंद्राने `मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग` खाते सुरु करावं, जितेंद्र आव्हाड यांचा टोला
हिजाब वादावरुन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
Hijab Controversy : लोकांनी काय घालावं, काय खावं, कुठला पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण? त्यापेक्षा केंद्रात एक मंत्रीच करा मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग असं खाते सुरु करा त्यामुळे सर्व प्रश्न मिटतील असा टोला राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. सध्या सुरु असलेल्या हिजाब वादावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कल्याणात आले होते यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केली.
महापालिका निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागा असं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं. या कार्यक्रमात गेल्या निवडणुकीत निवडून आलेले आणि भाजपला समर्थन देणारे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या .याबाबत आव्हाड यांनी आताच काही सांगणार नाही वेळ आल्यावर उघड करू असं सांगितलं.
तर कुणाल पाटील यांनी माझ्यासह आणखी काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात राष्ट्रवादीमध्ये इंकमिंग सुरू होणार असल्याचं चित्र आहे.
पालिकेसाठी शिवसेनेबरोबर आघाडी?
केडीएमसी निवडणूकीत शिवसेनेसोबत आघाडी होणार का या प्रश्नावर उत्तर देताना आम्ही आघाडी करायला तयार आहोत. मात्र त्यांच्या मनात काय आहे हे ओळखायला मी काही ज्योतिषी नाही असा चिमटा शिवसेना नेत्यांना काढला.
डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्यांना स्थलांतर बाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी जर लोकांच्या हाताच काम जात असेल तर विरोध करायला हवा अस स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी विरोध दर्शवत महाविकास आघाडी सरकारला घराचा आहेर दिल्याची चर्चा आहे