मुंबई  : केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचे दर कमी केले. महागाईत किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या करात कपात केली त्यामुळे या राज्यांत पेट्रोल-डिझेलचे दर आणखीणच खाली आले आहे. मात्र दुसरीकडे मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे दर शंभर रुपयांच्या पुढेच आहेत. हे दर नेमके का चढेच राहीले आहेत, याचे कारण जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कर कमी केला. त्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर आता राजस्थान, केरळ आणि ओडीसा सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे.


केरळ सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात 2.41 रुपये आणि 1.36 रुपयांची कपात केलेय. केरळ सरकारप्रमाणेच आता राजस्थान सरकारने सुद्धा पेट्रोलवरील कर 2.48 रुपये आणि डिझेलवरील 1.16 रुपये प्रति लिटरने कमी केलेत. ओडिसाने सुद्धा कर कमी केल्याने पेट्रोल 2.23 रूपये आणि डिझेल 1.36 रूपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे.


मात्र, महाराष्ट्रातलं चित्र वेगळ आहे. मुंबईत आज पेट्रोलचे दर 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर आहेत. मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे दर चढेच आहेत. त्यामुळे मुंबईकरांना तितकासा दिलासा मिळालेला नाही आहे.


मुंबईत दर चढे राहण्याचे 'हे' आहे कारण?


देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी केंद्राला जातो. 


जीएसटी परतावा मिळवण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र केंद्राकडून थोड्या प्रमाणात हा परतावा  मिळत असल्याचा आरोप राज्य सरकार करते. 


राज्य सरकारने आपल्या अखत्यारीतील कर कमी केल्यास राज्याच्या महसूलात तूट निर्माण होण्याची शक्यता आहे.राज्यावर आधीच हजारो कोटींचे कर्ज आहे. त्यामानाने उत्पन्न कमी आहे. शिवाय केंद्राकडून जीएसटी परताव्याची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने राज्यातील विकासकामांवर परीणाम होतोय. 


अशातच पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यास त्याचे गंभीर परीणाम राज्याला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे केंद्राने जरी हे दर कमी केले असले तरी राज्य सरकारला देणे असलेली जीएसटी परताव्याची रक्कम केंद्राने दिल्यास राज्य सरकार तत्काळ आपला कर कमी करू शकेल. 


केंद्र आणि राज्य सरकारच्या या वादात सामान्य माणूस मात्र भरडला जात आहे. 


पेट्रोल-डिझेलचे आजचे दर  


दिल्ली       :  96.72 ( पेट्रोल ) ,  89.62 (डिझेल) प्रति लीटर
मुंबई          : 111.35 ( पेट्रोल ) ,   97.28 (डिझेल) प्रति लीटर
जयपुर        : 108.48 ( पेट्रोल ) ,  93.52 (डिझेल) प्रति लीटर
चेन्नई        : 102.63 ( पेट्रोल ) , 94.24  (डिझेल) प्रति लीटर
कोलकता   : 106.03 ( पेट्रोल ) , 92.72  (डिझेल) प्रति लीटर
नोएडा        : 96.57 ( पेट्रोल ) , 89.96 (डिझेल) प्रति लीटर
पटना          : 107.24 ( पेट्रोल ) ,  94.04 (डिझेल) प्रति लीटर
लखनऊ      :  96.57  ( पेट्रोल ) ,  89.76  (डिझेल) प्रति लीटर