राज्यातील पालिकेचे उत्पन्न घटण्यास केंद्र सरकार जबाबदार- अजित पवार
महापालिकेचे उत्पन्न घटण्याला केंद्र सरकारची धोरणं आणि आर्थिक संकट कारणीभूत
पुणे : प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. राज्यातील महापालिकेचे उत्पन्न घटले याला केंद्र सरकारची धोरणं आणि आर्थिक संकट कारणीभूत असल्याचे मतं अजित पवार यांनी व्यक्त केले. पुण्यात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावर्षी १ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभुमीवर त्यांनी हे विधान केले.
केंद्रामुळे पालिकेचा अर्थसंकल्प मोडकळीस येत असल्यामुळे केंद्राच्या अर्थ संकल्पावर राज्य सरकार विशेष लक्ष ठेवणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले. केंद्राचा अर्थसंकल्प आल्यानंतरच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे केंद्रात सत्ता असलेले भाजपचे नेते यावर काय प्रतिक्रिया देणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कर्मचारी नजरकैदैत
अर्थसंकल्प गोपनीय असल्याने त्याच्या छपाईच्या काळात अर्थमंत्रालयात कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येते. अर्थसंकल्पाची हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेत छपाई केली जाते. अर्थमंत्रालयातील नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा सेरेमनी पार पडल्यानंतर अर्थसंकल्पासंबंधी मंत्रालयातील सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत पुढील १५ दिवस नजरकैदेत ठेवण्यात येत आहे. त्यांना बाहेरील कोणत्याही व्यक्तीशी बोलण्याची मुभा नसते. त्यांच्या कुटुंबियांशीही ते बोलू शकत नाहीत. त्यांना मोबाईल वापरण्यासाठीही बंदी घालण्यात आलेली असते. नजरकैदेत असताना कर्मचाऱ्यांना मंत्रालयातच राहावं लागतं.