साप्ताहिक विशेष रेल्वेंमुळं प्रवाशांची मजाच मजा; नाशिक- इगतपुरी- परभणी सहज गाठता येणार, पाहा वेळापत्रक
Indian Railway Diwali special Train : दिवाळीनिमित्त जिथे जायचंय तिथे जा, रेल्वेनं करुन दिलीय विशेष रेल्वेची सोय... पाहा कसं आहे वेळापत्रक...
Indian Railway Diwali special Train : दिवाळीच्या लांबलचक सुट्टीनिमित्त एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जायचा अनेकांचाच सहभाग असतो. दैनंदिन कामातून वेळ काढत काही वेळ कुटुंबीयांना देण्यासाठीचा हा एक लहानसा प्रयत्न असतो. तर, काही मंडळी सुट्टीच्या निमित्तानं नवनवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रयत्न करत असतात. सुट्टी म्हटलं की काही ठिकाणं हमखास यादीत डोकावतात. मग ते कोकण असो किंवा सातारा, किंवा अगदी दूरच्या राज्यातली ठिकाणं.
यंदाच्या वर्षी दिवाळीनिमित्त फक्त कोकणच नव्हे, तर थेट नाशिक, परभणी मार्गाच्या दिशेनं निघणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाच्या वतीनं खास आखणी करण्यात आली आहे. त्यामुळं यंदाच्या दिवाळीनिमित्त जिथं मन आणि इच्छा करेल तिथं जा, असं म्हणायला हरकत नाही. मध्य रेल्वे प्रशासनाने दिवाळीनिमित्त शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचा वाढणारा आकडा लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दादर-काजीपेट उत्सव विशेष रेल्वेगाडी ही त्यापैकीच एक. गाडी क्रमांक 07196/07195 दादर – काजीपेट ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी (Weekly Special Train) 28 नोव्हेंबर ते 30 जानेवारीदरम्यान आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी चालवण्यात येणार आहे.
रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 07195 काजीपेट – दादर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 27 नोव्हेंबर – 28 जानेवारीदरम्यान आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी प्रवाशांच्या सेवेत हजर असेल. निर्धारित काळात या विशेष रेल्वेच्या एकूण 9 फेऱ्या असतील. त्याशिवाय ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आरमुर, मेटपल्ली, कोराटला आणि लिगंमपेट जगित्याल या स्थानकांवर थांबेल.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्य
07198 दादर-काजीपेट ही विशेष गाडी आठवड्यातून एकदा पिंपळखुटी, बल्लारशाह मार्गे धावेल. ही रेल्वेगाडी 1 डिसेंबर – 26 जानेवारीदरम्यान दर रविवारी तर, गाडी क्रमांक 071497 काजीपेट – दादर साप्ताहिक विशेष दर शनिवारी चालवण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर – 25 जानेवारीदरम्यान ही गाडी प्रवाशांच्या सेवेत असेल.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार या रेल्वे
वरील दोन्ही रेल्वेगाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हूजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपळखुटी, लिंगटी, कायर, वणी, भांदक, चंद्रपूर, बल्लारशाह, सिरपुर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचिरयाल, पेड्डापल्ली आणि जमिकुंटा इथं थांबतील. 22 ऑक्टोबरपासून या सर्व रेल्वेगाड्यांच्या आरक्षण प्रक्रियेस सुरुवात झाली असून, सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत संकेतस्थळावर आरक्षण करता येत आहे.