मुंबई : कोरोना व्हायरसमुळे गेल्या ५ महिन्यांपासून देशभरातली रेल्वे सेवा बंद आहे. पण आता रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी कोकणात स्पेशल ट्रेन चालवण्याची तयारी  दर्शवली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला विचारणा केली आहे. राज्य सरकारने होकार कळवल्यानंतर कोकणात गणपतीसाठी विशेष रेल्वे चालण्यात येतील, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवाच्या काळात कोकण विभागात (फक्त महाराष्ट्रात) स्पेशल ट्रेन चालण्याबाबत राज्य सरकारची भूमिका काय आहे? तसंच या काळात किती आणि कोणत्या तारखांना ट्रेन चालवण्यात याव्यात? याबाबत रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला विचारणा केली आहे. 


सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून रेल्वे कोकणात स्पेशल ट्रेन चालवायला तयार आहे, पण याबाबत राज्य सरकार विचार करत असल्यामुळे सध्या या ट्रेनचं वेळापत्रक थांबवून ठेवण्याचं महाराष्ट्र सरकारमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवरुन सांगितल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे. याबाबतचा निर्णय झाल्यानंतर रेल्वेला कळवण्यात येईल, असंही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा रेल्वेने केला आहे. 


मध्य रेल्वे कोकणात गणपतीसाठी स्पेशल ट्रेन सोडायला तयार आहे, फक्त आम्हाला राज्य सरकारच्या होकाराची प्रतिक्षा आहे, असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.