मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई! वर्षभरात तब्बल 86 व्यक्तींचा वाचवला जीव
Central Railway: रेल्वे सुरक्षा दलाने (Railway Protection Force) गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 86 लोकांचा जीव वाचवला आहे. यामधील 33 घटना एकट्या मुंबईतील आहेत.
Central Railway: रेल्वे सुरक्षा दल (RPF) कर्मचाऱ्यांवर रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असते. यासाठी सुरक्षा दलाचे जवान नेहमीच आघाडीवर आणि 24 तास जागरुक राहतात. याशिवाय अनेकदा आरपीएफ कर्मचारी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्राणही वाचवतात. यासाठी अनेकदा ते स्वत:चा जीव धोक्यात टाकतात.
'मिशन जीवन रक्षक'चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मध्य रेल्वेत आतापर्यंत 86 लोकांचे प्राण वाचवले आहेत. काही वेळा स्वतःचा जीवही धोक्यात घालतात. या घटनांचे फोटो, सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात.
या 86 घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात 33 घटना घडल्या आहेत. याशिवाय नागपूर विभागात 17, पुणे विभागात 13, भुसावळ विभागात 17 आणि सोलापूर विभागात 6 व्यक्तींचा जीव रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीतील अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच ट्रेन आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यासह ते प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवतात.
ट्रेन पकडताना अनेक प्रवासी निष्काळजीपणा करतात. काही प्रवासी तर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किवा उतरण्याचा प्रयत्न करत जीव धोक्यात घालत असतात. आरपीएफने सतर्कतेने अशा अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. याशिवाय आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याही अनेकांचे जीव वाचवण्यात आले आहेत.
मध्य रेल्वे नेहमीच प्रवाशांना धावत्या ट्रेनमधून चढून किंवा उतरून आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन करत असते. कृपया ट्रेन सुटण्याच्या वेळेआधीच स्टेशनवर पोहोचावे असं आवाहन पुन्हा एकदा मध्य रेल्वेने केलं आहे.