Mumbai - Goa Special Train: नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याला जायचा प्लान आखताय. तर, मध्य रेल्वेने तुमच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. मुंबईकरांना गोव्यातील नवर्षाच्या जल्लोषात सहभागी होता येणार आहे. मध्य रेल्वेने डिसेंबरअखेरीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मुंबईहून गोव्याला जाणे सोप्पे होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो नागरिक भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्लान आखतात. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे गोवा. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी हजारो लोकांची पावलं गोव्याकडे वळतात. त्यामुळं ट्रेन, विमान आणि रस्ते मार्गानेही गोव्याला जायचं म्हणजे खर्चिक जाते. कारण अशावेळी तिकिटांचे पैसेही वाढतात. तसंच, गर्दीही खूप असते. यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेने डिसेंबर अखेरीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित रेल्वेगाड्यांसह मुंबई – थिवी, पनवेल – करमळी या दरम्यान २८ विशेष फेऱ्या धावतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 


मुंबई – थिवी रेल्वेगाड्या


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान रात्री १२.२० वाजता गाडी क्रमांक ०११५१ दैनिक विशेष रेल्वेगाडी (१२ फेऱ्या) सुटेल आणि थिवि येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. तसेच याच काळात दुपारी ३ वाजता थिवि येथून गाडी क्रमांक ०११५२ दैनिक विशेष रेल्वेगाडी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ३.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे येथे थांबा असेल. या गाडीला एकूण २२ डबे असून एक वातानुकूलित द्वितीय, तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी अशी या रेल्वेगाडीची संरचना असेल.


पनवेल – करमळी – पनवेल विशेष (साप्ताहिक) ४ फेऱ्या


गाडी क्रमांक ०१४४७ विशेष २३ डिसेंबर आणि ३० डिसेंबर रोजी रात्री १० वाजता पनवेल येथून सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४८ विशेष गाडी २३ डिसेंबर आणि ३० डिसेंबर रोजी सकाळी ९.२० वाजता करमळी येथून निघेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला २२ डबे असून एक द्वितीय वातानुकूलित, ४ वातानुकूलित तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह २ सामान्य द्वितीय श्रेणी अशी तिची संरचना असेल. 


बुकिंग कधी करता येणार


मुंबई – थिवी, पनवेल – करमळी विशेष रेल्वेगाड्यांसाठी विशेष शुल्क आकारले जाणार असून, २१ नोव्हेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर तिकीट आरक्षण सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.