Railway Terminals News in Marathi: रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी अन् लोकलवर येणारा ताण, याचा विचार करता मध्य रेल्वेकडून नेहमी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतात. याचदरम्यान मध्य रेल्वेवर चार नवे टर्मिनस उभारणारचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई आणि परिसरात सहा ठिकाणांची चाचपणी सुरू झाली आहे. यामध्ये पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे आणि परळ या ठिकाणी मेगा टर्मिनस उभारता येईल का, याची विचार करण्यात येत आहे. रेल्वेची जागा आणि  प्रवासी फलाट याचा विचार केला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वे बोर्डाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशातील सर्व प्रादेशिक रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सध्याच्या उन्हाळी सुट्टीत होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीबाबत दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. महामुंबईतून प्रवासी मागणी वाढती आहे. त्यामुळे पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे आणि परळ या ठिकाणी जागेची चाचपणी सुरु आहे. मात्र मेगा टर्मिनससाठी अद्याप सलग जागा उपलब्ध झालेली नाही.  


पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे आणि परळ या ठिकाणी मेगा टर्मिनस उभारण्याचे झाले तर यासाठी साडे सात एकर जागेची गरज आहे. कारण इथं 6 प्रवासी फलाट, 6 देखभाल मार्गिका, 6 पार्किंग मार्गिका आणि 10 अन्य मार्गिका असणार आहे. या नव्या टर्मिनसवरून लांब पल्ल्याच्या 40 नव्या एक्स्प्रेस चालवण्याचा रेल्वेचा प्लॅन आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारनं तिसरी मुंबई उभारण्याचा निर्णय काही आठवड्यांपूर्वी जाहीर केला होता. पनवेल आणि कळंबोली ही ठिकाणं या तिसऱ्या मुंबईपासून खूप जवळ आहेत, आणि तिथं देखील हे मेगा टर्मिनस उभारलं जाण्याची शक्यता आहे. 


...म्हणून चार मेगा टर्मिनस उभरणार


मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर येथून दररोज सुमारे 300 मेल-एक्स्प्रेस धावतात. परप्रांतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रेल्वे बोर्ड नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याचा विचार करत आहे. सध्याच्या टर्मिनसमध्ये नवीन रेल्वे गाड्या सामावून घेण्याची क्षमता नाही. यावर उपाय म्हणून मेगा टर्मिनसची योजना सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.