गृह मंत्रालयाच्या निर्णयावर निलेश राणेंचा आक्षेप; म्हणाले, `शरद पवारांना कोण मारणार आणि...`
Nilesh Rane Questions Centre Government Decision On Sharad Pawar: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावर नारायण राणेंच्या पुत्राने नोंदवला आक्षेप
Nilesh Rane Questions Centre Government Decision On Sharad Pawar: माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्र तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी थेट केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे फायर ब्रॅण्ड नेते अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावरुन निलेश राणेंनी खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. बुधवारी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांना केंद्र सरकारकडून अति महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची उच्च श्रेणीतील सशस्त्र सुरक्षा कवच प्रदान केले. शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुनच निलेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
का वाढवली पवारांची सुरक्षा?
गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) शरद पवारांना अधिक भक्कम सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिलेत. 83 वर्षीय शरद पवार यांच्या भोवती सुरक्षेचं कडं अधिक मजबूत केलं जाणार असून त्यांच्या सुरक्षेत 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची टीम नियुक्त केली जाणार आहे. केंद्रातील एजन्सींनी केलेल्या धोका मूल्यांकनाच्या आढाव्यानुसार पवारांना मजबूत सुरक्षा कवच देण्याची शिफारस करण्यात आली होती. याचसंदर्भात सीआरपीएफच्या टीमने शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पवारांची सुरक्षा वाढवण्यावर एकमत झाल्यानंतर सुरक्षा वाढवली आहे. सीआरपीएफची एक टीम महाराष्ट्रात या कामासाठी आधीच दाखल झाली आहे.
राज्यात सुरु असलेल्या विविध घडामोडींमुळे पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात केलाचे समजते. बुधवारी सायंकाळी शरद पवार यांच्याशी केंद्र सरकारच्या वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी शरद पवारांना सुरक्षा कशी आणि कशासाठी वाढवली जात आहे यासंदर्भातील कल्पना दिल्याचे समजते. अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शरद पवारंनी सीआरपीएफची सुरक्षा स्वीकारली आहे.
निलेश राणेंचा सवाल
शरद पवारांची सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याचं रात्री उशीरा स्पष्ट झाल्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास निलेश राणेंनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन प्रतिक्रिया नोंदवताना या निर्णयावर खोचक पद्धतीने आक्षेप घेतला. "शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, 55 सीआरपीएफ जवान त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे? बातमी वाचली आणि वाटलं की ५० वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?" असा खोचक सवाल निलेश राणेंनी विचारला आहे.
कोणाला पुरवतात अशी व्हीआयपी सुरक्षा?
देशातील प्रसिद्ध राजकीय नेते, मोठे कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटूंना सरकारकडून अति महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी सुरक्षा पुरवली जाते. या अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून आणि प्रामुख्याने गृहमंत्रालयाकडून घेतला जातो. एक्स, वाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत. वेळोवेळी परिस्थितीनुसार, सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर सरकारकडून व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेच्या दर्जामध्ये बदल केला जातो.
पवारांची आधीची सुरक्षा कायम
झेड प्लस कॅटेगरीमध्ये सुरक्षेसाठी 36 जण तैनात असतात. यात दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. शरद पवारांना झेड प्लसबरोबरच यापूर्वी असलेली राज्य सरकारची सुरक्षा कायम राहणार असल्याने पवारांभोवती आता 55 जणांचे कवच असणार आहे. पवारांना आता दिल्या जाणाऱ्या सुरक्षेमध्ये सर्व कमांडोज अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि उपकरणांनी सुसज्ज असतात.