हेमंत चापु़डे, झी मीडिया, चाकण : पुणे जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण होत असताना गुन्हेगारीच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकणमधल्या भांबोली फाटा इथं मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी चक्क स्फोट घडवून आणला. एटीएममध्ये तब्बल 25 ते 30 लाख रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी ब्लास्टसाठी उच्च दर्जाची स्फोटकं वापरली होती. चोरीच्या या नव्या पद्धतीने पोलीस चक्रावले आहेत.


मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएममध्ये स्फोट केला. हा स्फोट अत्यंत भीषण स्वरुपाचा होता. यात एटीएमचे शटर तुटलं असून परिसर या स्फोटाच्या आवाजाने हादरला.  


स्फोटकाच्या सहाय्याने ATM फोडल्याची ही पहिलीच घटना असल्याचं पोलीस उपायुक्तांनी म्हटलं आहे. या स्फोटात IED अर्थात उच्च दर्जाचं स्फोटक वापरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस, ATS, CRPF आणि BDDS या तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. पैसे लुटण्याची नवीन मोडस ऑपरेंडी चोरट्यांनी अंमलात आणल्याचं दिसत आहे. यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे.