विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत किमया दाखवणारी एमआयएम वंचित बहुजन आघाडी आता तुटण्याच्या मार्गावर आहे. एमआयएमनं मागितलेल्या जागा प्रकाश आंबेडकरांना मान्य नाहीत. त्यांनी दिलेली ऑफर एमआयएमला मान्य नाही. यामुळं दलित मुस्लीम मतांची ही मोट आता फुटण्याची चिन्हं असून आता फक्त औपचारीक घोषणाच तेवढी बाकी आहे असं म्हणावं लागेल. 
 
लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीनं भल्याभल्यांना घाम फोडला. इतकंच नाही तर औरंगाबादच्या रुपानं एक खासदारसुद्धा त्यांना मिळाला, या आघाडीनं राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची धुळधाण उडवली, मात्र हीच आघाडी आता तुटल्यात जमा आहे, कारण एमआयएमनं वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीला 100 जागांची मागणी केली होती, त्यानंतर ही मागणी 75 वर आली त्यानंतर अगदी 50वरही एमआयएम तयार झाली, मात्र आंबेडकरांनी या सगळ्यांच मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांच्या माहितीनुसार आंबेडकरांनी एमआयएमला फक्त 8 जागा देवू केल्या आहेत, त्यापेक्षा जास्त जागा मिळणार नाही असंही त्यांनी एमआयएमला कळवलं आहे. यामुळं एमआयएम मात्र चांगलचं संतापलं आहे. 8 जागांचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला आहे. आठवडा भरापूर्वी ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात बैठक झाली होती, तिथंही आंबेडकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती अशी माहिती मिळते आहे. त्यात सध्य़ा तरी याबाबत एमआय़एम संयमी भूमिका घेत आहे, एमआय़एम प्रदेशअध्यक्ष तर आम्हाला काहीच माहिती नाही असं सांगून वेळ कानावर हात ठेवत आहेत.


गेल्या वेळी आम्ही एकटे 24 जागांवर लढलो त्यामुळं इतक्या कमी जागा लढणार नाही अशी एमआयएमची ठाम भूमिका आहे, त्यात आंबेडकर ऐकायला तयार नाही असं कळतंय, तर आंबेडकरही याबाबत सध्या स्पष्ट बोलायता तयार दिसत नाही, काँग्रेससोबतची बोलणी झाल्यावर एमआयएमचं पाहू अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे.


लोकसभा निवडणूकांत वंचितच्या झेंड्याखाली लढून एमआय़एमनं विजय मिळवला, एमआयएमच्याच पाठिंब्यावर वंचितनं अनेक दिग्गजांचा पराभव सुद्धा केला, मात्र आता ही मैत्री तुटण्याच्या मार्गावर आहे, एमआयएमचा मोठा भाऊ प्रकाश आंबेडकर आता एमआयएमला दूर सारू पाहत आहे, आणि विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर या दलित मुस्लिम आघाडीला हा मोठा धक्का मानला जातो आहे. आता फक्त वेगवेगळे लढणार या घोषणेची औपचारीकताच तेवढी बाकी आहे.