अभयरण्यासाठी गाव उठवलं...पण या कुटुंबाचे पुनर्वसन कधी?
चांदोली अभयारण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील गोठणे गाव त्या ठिकाणाहून उठवण्यात आलं व त्याच गावाचं पुनर्वसन हातीव येथे करण्यात आले आहे. याच अभयरण्यासाठी रघुनाथ गणपत पवार यांच्या कुटुंबियांची जमीन गेली खरी पण अद्यापही या कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही.
प्रणव पोळेकर, रत्नागिरी : चांदोली अभयारण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील गोठणे गाव त्या ठिकाणाहून उठवण्यात आलं व त्याच गावाचं पुनर्वसन हातीव येथे करण्यात आले आहे. याच अभयरण्यासाठी रघुनाथ गणपत पवार यांच्या कुटुंबियांची जमीन गेली खरी पण अद्यापही या कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही.
गेली ५ वर्ष पुनर्वसन व्हावं व आपल्याला हक्काची जागा मिळावी यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ पवार कुटुंबियांवर आलीय. चांदोली व्याघ्र प्रकल्पात संगमेश्वर तालुक्यातल्या गोठणे गावाचा समावेश आहे. मात्र अभयारण्यासाठी हे गाव पूर्णपणे हातीव इथं स्थलांतरित करण्यात आलं.
गोठणे गावातल्या जमिनीवर शेती व्हायची त्यातून वर्षभर कुटुंबाचं भागायचं. मात्र प्रकल्पग्रस्तांची शेतीही गेली आणि राहतं घर देखील गेलंय. आता या घटनेला पाच वर्षे पूर्ण झालीयत. तरी देखील रघुनाथ पवार यांचं कुटुंब न्यायासाठी झगडतंय.
पवार कुटुंब हातीव शेजारच्या आंगवली गावात भाड्यानं राहतंय. कुटुंबाचं रेशनकार्ड मात्र हातीव पुनर्वसन इथलं आहे. मतदान यादीत नाव देखील आहे. मात्र असं असतानाही शासनानं त्यांना भूखंडापासून अजूनही वंचितच ठेवलंय. पुनर्वसनाच्या मिळालेल्या रकमेपैकी ६५ टक्के रक्कम त्यांनी शासनाला परत दिलीय. मात्र शासनानं या रक्कमचं व्याज, निर्वाह भत्ता आणि शेतजमीनही दिलेली नसल्याचं या कुटुंबाचं म्हणणंय.
यासंदर्भात झी 24 तासनं जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी भूखंड देण्याबाबत उशीर का झाला यासंदर्भात चौकशी केली जाईल आणि प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांना न्याय नक्कीच दिला जाईल असे आश्वासन दिलेय.