प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : समाजात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं ताजं उदाहरण समोर आले आहे. मन सुन्न करणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) झालेल्या अपघातामुळे पोरक्या झालेल्या चांदणी पावरा या मुलीसाठी समाजातील सर्वच घटकातून मदतीचे हात पुढे येत आहेत. सोशल मीडियावर चांदणीची दुर्दैवी गोष्ट समोर आली आणि त्यानंतर तिला मदतीचा ओघ सुरु झाला आहे. आधीच वडील नाही त्यात धुळ्यात (Dule Accident) झालेल्या भीषण अपघातात लहानसा भाऊ हिरवाला. तर आई रुग्णालयात गंभीर जखमी आहे. त्यामुळे आता दुःख व्यक्त करायला कोणचा खांदाही नसलेल्या चांदणीची घालमेल आणि दुःख पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांदणीच्या घराघरा समोर सुरु असलेला आक्रोश आणि महिलांनी फोडलेला हंबरडा अंगावर शहारा आणत आहे. धुळे जिल्ह्यातील  कोळशापानी या पाड्यात पिंपळनेर येथील अपघाताने होत्याचे नव्हते केले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 10 पैकी 5 जण हे कोळशापानी पाड्याचे आहेत. गावात अपघातानंतर चूल पेटलेली नाही. गावात फक्त सर्वत्र दुःख आणि आकांत आहे. या अपघातात अजून एक दुर्दैवी कहाणी चांदणीची आहे. चांदणीचे वडील काही वर्षपूर्वी दगावले होते. भावाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या आईला भरधाव ट्रेरलरनं चिरडलं. यामध्ये भावाचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी आहे. अवघ्या 10 वर्षांच्या चांदनीला सांभाळायला घरात कोणी नाही. तिला रडायलाही कोणाचा खांदा नाही.


चांदणी सध्या एकटी पडली आहे. चांदणीला धीर देण्यासाठी कोणीच घरात राहिलेलं नाही. अशाही परिस्थितीत ती कोणाला काही न सांगता घरातच एकटी, काही चांगली बातमी येईल आणि दिलासा मिळेल याचीच वाट पाहत बसली आहे. चांदणीचं हे वास्तव सोशल मीडियातून समोर आल्यानंतर समाजातील विविध घटकांनी तिला मदतीचा ओघ सुरू केला आहे. यंग फाउंडेशनच्या वतीने तिच्या कुटुंबाला किराणा साहित्य देण्यात आले आहे. तर सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या सैनिकी शाळेमध्ये बारावीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे. नाम फाउंडेशनने देखील तिची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी तिला फाउंडेशनच्या मदतीने पाच लाख रुपयांची मदत देण्याच आश्वासन दिल आहे.


दरम्यान, धुळ्यातील पिंपळनेर गावात मुंबई-आग्रा महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कंटेनरने कार, पाच दुचाकी आणि दोन मालवाहू वाहनांना जोरदार धडक दिली होती. त्यानंतर कंटेनर थेट हॉटेलमध्ये जाऊन धडकला होता. या भीषण दुर्घटनेत कंटेनरखाली चिरडून नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत.