विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. मात्र हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचं अनेकदा समोर आलं आहे, असलाच एक प्रकार पुन्हा औरंगाबादेत एका कार्यक्रमात झाला, खैरे नेहमीप्रमाणे कार्यक्रमाला उशीरा आले, कार्यक्रम सुरु झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खैरेंची खुर्ची खासदार इम्तियाज जलील यांच्या बाजूला लावली होती, त्यामुळे खैरेंचा चांगलाच पारा चढला, त्यांनी ती खुर्ची बाजूला करायला लावली, त्यामुळं आयोजकही गोंधळले, जलील यांच्या बाजूची खुर्ची मात्र रिकामीच होती, आणि खैरे काही स्टेजवर जायला तयार नव्हते.


अखेर नव्यानं निवडून आलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे इम्तियाज जलील यांच्या बाजूला बसले आणि त्यानंतर खैरे त्यांच्या बाजूला बसले आणि हा खुर्चीचा वाद निवळला. मात्र, कार्यक्रमात किस्सा कुर्सी का चांगलाच गाजला. यावर इम्तियाजल जलील यांनी खैरेंना असला पोरकटपणा बंद करा असा सल्लाही दिला...


त्यानंतरही खैरेंचा पारा पुन्हा चढला, कारण कार्यक्रमातील वक्त्यांकडून माजी खासदार असा उल्लेख करण्यात येत होता. यावर खैरे म्हणाले, “मी कार्यक्रमात आल्यापासून बघतोय माझा उल्लेख माजी खासदार म्हणून केला जातोय. काय माजी खासदार, माजी खासदाय लावलंय...



मी आजही शिवसेनेचा नेता आहे आणि लोक माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात.” या सगळ्यात कार्यक्रमात सगळेच तोंड बंद करून हसत असल्याचं चित्र पहायला मिळालं, यावर मी खासदार निवडून आल्याचं अजूनही काही लोकांना मान्य नसल्याचं सांगत जलील यांनी खैरेंची टिंगलच केली..


या सगळ्यावर बोलायला खैरे यांनी नकार दिलाय. खैरेंची चिडचिड त्रागा, निवडणूक संपल्यावरही काही केल्या कमी होईना याचीच प्रचिती मात्र या कार्यक्रमातून आली.