कोल्हापूर : राज्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेची युती अभेद्य असल्याचा दावा केला जातोय. पण ही युती कोल्हापुरात अभेद्य आहे का ? याबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कोल्हापूर दक्षिणमध्ये शिवसेना खासदाराच्या वेगळ्या भूमिकेमुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा तिळपापड झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यात युती धर्म पाळला जाणार नाही, हे स्पष्ट करणार शिवसेना खासदार संजय मंडलीक याचं हे विधान..लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटलांनी संजय मंडलिक यांना मदत केली होती. 


या मदतीची मंडलिक विधानसभा निवडणुकीत परतफेड करणार याची चर्चा आहे. अगोदरच कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाला आठपैकी २ जागा मिळाल्यात. त्यातल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपा उमेदवाराविरोधा शिवसेनेची वेगळी भूमिका पाहून चंद्रकांत पाटील शिवसेनेवर चिडलेत.


भाजपाचे उमेदवार अमल महाडिकांवर चंद्रकांत पाटलांचा खूप जीव आहे. संजय मंडलिक आणि सतेज पाटलांचं अगोदरच ठरलंय. पण त्यामुळं चंद्रकांत पाटलांच्या जवळच्या अमल महाडिकांच्या जागेला धोका निर्माण झाला आहे. शिवसेनेनं कोल्हापूर दक्षिणमध्ये दगाफटका केल्यास त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यात उमटण्याची शक्यता आहे.