मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी आम्ही एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावासाठी आग्रही होतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पंकजा मुंडे यांना तिकीट का नाकारण्यात आलं? याचं कारणही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. झी २४ तासला चंद्रकांत पाटील यांनी विशेष मुलाखत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेचं तिकीट ज्यांना मिळतं त्यांना विधानपरिषदेचं तिकीट द्यायचं नाही, असा नियम केंद्रीय समितीने केला आहे. संपूर्ण भारतामध्ये हा नियम लागू आहे, म्हणून पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आलं नाही, असं पाटील म्हणाले. 


विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर बारामतीमधून अजित पवारंच्याविरुद्ध उभे होते, पण तरीही त्याला विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली, कारण विधानसभेवेळी त्यांना बारामतीमधून उभं राहायचं नव्हतं. आम्हीच त्याला घोड्यावर बसवलं होतं. या कारणासाठी गोपीचंद पडळकर यांना विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. 


पंकजा मुंडेंचं समर्थक असणाऱ्या रमेश कराड यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी देण्यात आली. केंद्रीय समितीने डॉ.अजित गोपछडे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतरही त्यांना अर्ज मागे घ्यायला लावण्यात आला. कराड यांना उमेदवारी देऊन भाजप पंकजा मुंडेंना शह द्यायचा प्रयत्न करत असल्याचंही बोललं गेलं. या सगळ्यावरही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. 


खडसेंना भाजपने काय काय दिलं? चंद्रकांत पाटील यांनी वाचला पाढा


'गोपीनाथ मुंडेंनी पक्ष वाढवला, त्यांच्या घरात असा पर्याय निर्माण करण्याचा विषय स्वप्नातही आमच्या डोक्यात येणार नाही. रमेश कराड यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी, यासाठी पंकजाताई भांडल्या, पण ती जागा शिवसेनेला गेल्यामुळे त्यावेळी कराड यांना उमेदवारी देता आली नाही. आता कराडांना उमेदवारी दिल्यामुळे पंकजाताईंना आनंदच झाला असेल,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीट न मिळाल्याचं सर्वाधिक दु:ख असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं. बावनकुळेंचा काहीही दोष नव्हता. बावनकुळेंसाठी आम्ही केंद्रीय समितीशी भांडलो. बावनकुळेंचं नाव का कापलं? याबाबत आम्हालाही कल्पना नाही, असं पाटील म्हणाले. 


खडसेंची खळबळजनक मुलाखत 


पंकजाताई, खडसे आणि बावनकुळेंनी खचून जायची गरज नाही. तिकीट मिळणं हेच राजकारण आहे का? पक्षात काम करणं हे राजकारण नाही? जबाबदारी घ्या, राज्यभर फिरा, पक्ष वाढवा, असा सल्लाही पाटील यांनी नेत्यांना दिला.


'तुमच्या दोघांच्या घरात पक्षाने सगळं दिलं, आता देऊ नये असं नाही. तिकीट देण्यासाठी आम्ही बरेच भांडलो. आता देवेंद्र फडणवीसांनी छाती फाडून दाखवायची का? किती भांडलो म्हणून,' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. 


'...तर खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागत', बाळासाहेब थोरांची ऑफर


मेधा कुलकर्णींवरही निशाणा


चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्यावरही निशाणा साधला. विधानसभेवेळी मला कोल्हापूरमधून निवडणूक लढवायची होती, पण केंद्रीय नेतृत्वाने कोथरुडचा मतदारसंघ दिला. त्यावेळी मेधा कुलकर्णी यांना प्रदेशाध्यक्ष या नात्याने भविष्यात विचार करू, असं सांगितल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


पक्षात तिकीट ही तुमची प्रॉपर्टी नाही, ती पक्षाची प्रॉपर्टी आहे. माझं तिकीट हिसकावून घेतलं म्हणता, तुम्ही तिकीट कुठून आणलं? पक्षाने व्होटबँक डेव्हलप केली, त्यात तुमचा वाटा आहे. पक्षाने त्यावेळा उपलब्ध असणारा चांगला उमेदवार म्हणून तुम्हाला तिकीट दिलं. पुढच्यावेळी उपलब्ध असणारा चांगला म्हणून दुसऱ्याला तिकीट दिलं. कोथरुडमध्ये काम करा. कोरोनामध्ये आम्ही काम करतोय, तुम्हीही करताय थोडंफार, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.