मुंबई : विधानपरिषदेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या एकनाथ खडसेंवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. भाजपने एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना काय काय दिलं? याचा पाढाच चंद्रकांत पाटील यांनी वाचला. घरातले प्रश्न चव्हाट्यावर आणण्याची भाजपची संस्कृती नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी हाणला. चंद्रकांत पाटील यांनी झी २४ तासला विशेष मुलाखत दिली.
'नाथाभाऊंना ७ वेळा विधानसभेचं तिकीट दिलं. दोनवेळा मंत्री केलं, विरोधीपक्षनेता केलं. मुलीला तिकीट दिलं. सुनेला तिकीट दिलं. हरीभाऊ जावळे विद्यमान खासदार होते, त्यामुळे त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. जावळेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतरही त्यांचं तिकीट नाकारून खडसेंच्या सुनेला लोकसभेचं तिकीट दिलं. मुलीला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्ष केलं. खडसेंच्या पत्नीला महानंदाचं अध्यक्षपद दिलं. आणखी किती द्यायचं? पक्षात काम करायचं म्हणजे फक्त आमदार होणं आहे का? असा विचार केंद्रातल्या नेत्यांनी केला असेल,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जावयांना किंवा लेकीला तिकीट दिलं नाही. आरोप करणाऱ्या दोघांच्या घरात लोकसभा खासदार आहेत, तरी तुम्हाला काहीही मिळालं नाही, असं वाटतं का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. खडसे, पंकजा मुंडे आणि बावनकुळेंच्या नावासाठी आम्ही दिल्लीकडे आग्रह धरला होता, असंही पाटील यांनी सांगितलं.
'घरातली भांडणं बाहेर न्यायची नाहीत, सगळं आपल्या ताटात ओढायचं नाही. दुसऱ्यांना मोठं करण्यात आनंद मानायचा. जे काही असेल ते बसवून सोडवू. सारखं टीव्हीवर जायचं नाही. हीच पक्षाची कार्यपद्धती आहे. नाथाभाऊंबद्दल आमचा हाच आक्षेप आहे,' असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
'नाथाभाऊ आमचे वडिल, त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी खस्ताही खाल्ल्या. त्यांना कान पकडण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी प्रदेश कार्यालय आहे. वेळ पडली तर मुक्ताईनगरला बोलवून आमच्या दोन थोबाडीत मारा, पण टीव्हीवर जाऊ नका,' असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना दिला आहे.
खडसेंनी आता पालक म्हणून काम करांव. तिकीट देणं किंवा नाकारणं हे केंद्रीय समितीच्या हातात आहे. केंद्रीय समितीने तुम्हाला राष्ट्रपती बनवलं तर आम्ही पेढे वाटू, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खडसेंना दिलेल्या ऑफरवरही पाटील यांनी टीका केली. ज्योतिरादित्य शिंदेंना तुम्ही पक्षात ठेवू शकला नाहीत. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. काँग्रेस नाथाभाऊंना कोपऱ्यात नेऊन ठेवेल, असा टोला पाटील यांनी हाणला. कोरोनानंतर काँग्रेसचे ३ नेते भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला.